मला कारागृहात पाठवा; पण मी लाच देणार नाही !
एका व्यावसायिकाने सरकारी कार्यालयात कपडे काढून केले वक्तव्य
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील ‘वस्तू आणि सेवा कर’ (जी.एस्.टी.) कार्यालयातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात एक व्यावसायिक स्वत:चे कपडे काढून कार्यालयात बसलेला दिसत आहे. त्याला लाच मागितल्याने तो नाराज असून म्हणत आहे की, माझ्याकडे पैसे नाहीत. मला कारागृहात पाठवा. जी.एस्.टी. अधिकार्यांनी त्याच्याकडे २ लाख रुपयांची लाच मागितली होती; मात्र त्याने ती दिली नाही. त्यामुळे अधिकारी त्याला त्रास देत असल्याचा आरोप या व्यावसायिकाने केला.
१. या व्हिडिओत अक्षय जैन नावाचे व्यावसायिक दिसत असून ते आधी आपला शर्ट आणि नंतर पँट काढतांना दिसत आहेत. त्यानंतर ते केवळ अंतर्वस्त्रात ध्यानाच्या मुद्रेत बसले आहेत.
२. जैन यांनी सांगितले, ‘मेरठहून माझ्या आस्थापनाने मागवलेले लोखंड आणणारी रेल्वे थांबवण्यात आली होती आणि माझ्यावर करचुकवेगिरीचा आरोप करण्यात आला. मी कोणताही कर चुकवलेला नाही; परंतु अधिकार्यांनी मला दंड ठोठावला.’ या कारणावरून ते जी.एस्.टी. कार्यालयात पोचले असून कपडे काढून खाली बसले.
३. या घटनेनंतर जी.एस्.टी. विभागाने या प्रकरणाची चौकशी चालू केली आहे.
४. ‘ही घटना केवळ वैयक्तिक प्रकरणच दर्शवत नाही, तर भ्रष्टाचारी प्रशासनाची कार्यपद्धतीवरही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करते’, असा संताप सामाजिक माध्यमांवरून व्यक्त केला जात आहे.
संपादकीय भूमिकाया घटनेतून भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशाची दुर्दशा लक्षात येते. भ्रष्टाचार संपवण्यासाठी गावपातळीपासून शहरांपर्यंत राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी शासनकर्ते, तसेच प्रशासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांची नितांत आवश्यकता आहे. यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! |