Indian Railway : लवकरच रेल्‍वे रुळांमधून विद्युत् पुरवठा केला जाणार !

आतंकवादी आणि समाजकंटक यांचा उपद्रव अल्‍प होणार

नवी देहली – रेल्‍वेगाड्यांना सध्‍या रुळांच्‍या बाजूला असलेल्‍या विद्युत् खांबांतून वीजपुरवठा केला जातो. आता मात्र ‘लाईव्‍ह रेल्‍वे’ अथवा ‘कंडक्‍टर रेल्‍वे’ द्वारे वीजपुरवठा केला जाणार आहे. राजधानी, शताब्‍दी आणि इतर रेल्‍वेगाड्या यांचे स्‍वरूप पालटण्‍यासमवेतच आता इंजिन (लोकोमोटिव्‍ह), विद्युत् खांब आणि ‘मॅन्‍युअल सिग्‍नलिंग’ आदी तांत्रिक पद्धतींमध्‍येही आमूलाग्र पालट केले जात आहेत. यामुळे काश्‍मीर खोरे, तसेच अन्‍यत्रही आतंकवादी आणि समाजकंटक यांचा उपद्रव घटणार आहे.

रेल्‍वे मंत्रालयातील सूत्रांनुसार वन्‍दे भारत, अमृत भारत, नमो भारत मेट्रो यांसारख्‍या नव्‍या मालिकेतील गाड्या आल्‍यानंतर ‘ट्रॅक्‍शन सिस्‍टम’, म्‍हणजेच वीजपुरवठा पालटण्‍यासाठी पथदर्शक चाचणी चालू झाली आहे. सध्‍या रुळांच्‍या बाजूला उभारलेल्‍या खांबांवरून गाडीला वीजपुरवठा केला जातो. आता रेल्‍वे रुळांच्‍या शेजारी एक नवी ‘लाइन’ लावली जाईल. त्‍यातून वीजेचा पुरवठा केला जाईल. यासाठी नव्‍या रेल्‍वेगाड्यांमध्‍ये ‘इन ट्रेन’ इंजिन या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामुळे धावणार्‍या रेल्‍वेगाड्यांनाही रुळातूनच वीज पुरवठा होईल.

संपादकीय भूमिका

रेल्‍वे मंत्रालयाने उचललेल्‍या या स्‍तुत्‍य पावलाच्‍या निमित्ताने त्‍याचे अभिनंदन ! यासह गृहमंत्रालयाने रेल्‍वे अपघात घडवणारे समाजकंटक आणि त्‍यांची विचारसरणी यांचा नायनाट करण्‍यासाठी निर्णायक प्रयत्न केले पाहिजेत !