देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘मेधा-दक्षिणामूर्ति यागा’च्या वेळी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना आलेल्या अनुभूती

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या व्यापक कार्यातील वाईट शक्तींचे अडथळे दूर व्हावेत, तसेच सद्गुरु, संत आणि साधक यांच्या सर्व प्रकारच्या त्रासांचे निवारण व्हावे’, यांसाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात (१७.३.२०२३) या दिवशी भगवान शिवाचे गुरुरूप असलेल्या ‘श्री दक्षिणामूर्ति’ या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्या वेळी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

१. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यागाला उपस्थित होत्या.

२. पुरोहित यागामध्ये आहुती देत असतांना ‘रामनाथी आश्रमाप्रमाणे देवद आश्रमातही चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे’, असे मला वाटले. 

३. अग्निदेवतेने आहुती (नारळ) स्वीकारणे आणि परत यज्ञकुंडात जाणे

पूर्णाहुती चालू असतांना ‘यज्ञकुंडातून प्रत्यक्ष श्री अग्निदेवता वर येतांना दिसली आणि तिने हळुवारपणे आहुती (नारळ) स्वीकारली आणि ती परत यज्ञकुंडामध्ये गेली’, असे मला दिसले.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे पांढर्‍या रंगाचा प्रवाह जातांना दिसणे

पुरोहित तुपाची धार यज्ञकुंडात सोडत होते. तेव्हा त्यांच्या डाव्या बाजूला काही अंतरावर सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले उभे असलेले दिसले. त्यांच्या हातातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे पांढर्‍या रंगाचा पारदर्शक प्रवाह जातांना मला दिसला.’

इदं न मम ।’

– सद्गुरु राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.३.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक