भारताच्या साहाय्याने मॉरिशसला ब्रिटनकडून परत मिळाले बेट
मॉरिशसच्या पंतप्रधानांनी मानले भारताचे आभार
नवी देहली – ब्रिटनकडून चागोस बेट(Chagos Islands) नियंत्रणात घेतल्यानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ (Pravind Kumar Jugnauth) यांनी भारत(India) सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. ‘वसाहतवादाविरुद्धच्या लढाईत सर्व सहकारी देशांनी आम्हाला साथ दिली आहे’, अशी पोस्ट त्यांनी एक्सवर केली. ब्रिटन(Britain) आणि मॉरिशस (Mauritius) यांच्यामध्ये चागोस बेटावरून गेल्या ५० वर्षांपासून वाद होता. या दोघांमध्ये या संदर्भात करार व्हावा, यासाठी भारत प्रयत्न करत होता. आता हा करार झाल्यानंतर भारताने दोन्ही देशांचे स्वागत केले आहे.
Mauritius thanks the African Union @AfricanUnion, the Government of India @narendramodi and all friendly countries which have supported us in our fight for completing our decolonisation. pic.twitter.com/bwfuwb3TrJ
— Pravind Kumar Jugnauth (@KumarJugnauth) October 4, 2024
काय होता वाद ?
मॉरिशसला वर्ष १९६८ मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले; पण ब्रिटनने चागोस बेटावरील त्याचा दावा सोडला नाही. हे बेट आपलेच असल्याचा दावा मॉरिशसने केला. वर्ष २०१७ मध्ये चागोस बेटावर संयुक्त राष्ट्रांमध्ये मतदान झाले. भारतासह ९४ देशांनी मॉरिशसच्या बाजूने, तर १५ देशांनी ब्रिटनच्या बाजूने मतदान केले. वर्ष २०१९ मध्ये, आंतरराष्ट्रीय न्यायालयानेही बेटाला मॉरिशसचा भाग घोषित केले.
मॉरिशसच्या स्वातंत्र्यापूर्वीच वर्ष १९६६ मध्ये अमेरिकेने ब्रिटनला ५० वर्षांच्या भाडेपट्टी करारावर दिएगो गार्सिया बेट दिले होते. वर्ष २०१६ मध्ये ही भाडेपट्टी आणखी २० वर्षांसाठी वाढवण्यात आली. येथे अमेरिकेने हवाई आणि नौदल तळ बनवला आहे. यासाठी अमेरिकेने येथे स्थायिक झालेल्या सहस्रो लोकांना हाकलून ब्रिटन आणि मॉरिशस येथे पाठवले होते.