भोगभूमी गोव्यात एवढा अद्भुत आश्रम निर्माण करणार्‍या महापुरुषाला माझे नमन !

चित्रकूट (मध्यप्रदेश) येथील भागवत भास्कर आचार्य श्री विपीन कृष्णजी महाराज यांची सनातनच्या गोवा येथील आश्रमाला सदिच्छा भेट !

आचार्य श्री विपीन कृष्णजी महाराज यांचा सन्मान करतांना पू. पृथ्वीराज हजारे

रामनाथी (गोवा), ६ ऑक्टोबर (वार्ता.) – सनातनचा गोवा येथील आश्रम म्हणजे साक्षात् वैकुंठच आहे. भोगभूमी अशा कलंकित नावाने ओळखल्या जाणार्‍या गोवा राज्यात एवढा सुंदर आश्रम उभारणार्‍या महापुरुषाला माझे नमन ! अशा महापुरुषाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागले, तरी ते अल्पच पडतील, असे आशीर्वचन चित्रकूट (मध्यप्रदेश) येथील भागवत भास्कर आचार्य श्री विपीन कृष्णजी महाराज यांनी दिले. ६ ऑक्टोबरला येथील सनातनच्या आश्रमाला महाराजांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांचा सन्मान सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी हार घालून आणि शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन केला. या प्रसंगी ‘गोवा मेडिकल कॉलेज’चे नाक-कान-घसा तज्ञ डॉ. मार्कंडेय तिवारी, ‘होली’ (हेल्पफुल ऑर्गनायझेशन फॉर लाईक माइंडेड इंडियन्स) या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे अध्यक्ष श्री. के.के. चतुर्वेदी, विशान सिंह राजपुरोहित, तसेच अन्य मान्यवर अन् भक्तगण उपस्थित होते.

या वेळी महाराजांनी आश्रमात चालणारे राष्ट्र आणि हिंदु धर्म रक्षणार्थ चालू असलेल्या कार्याची माहिती घेतली. सनातनचे साधक श्री. विक्रम डोंगरे यांनी त्यांना आश्रमातील धर्मप्रसाराच्या कार्याची माहिती अवगत करून दिली.

या प्रसंगी महाराजांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हटले की,

आचार्य श्री विपीन कृष्णजी महाराज

१. धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करणार्‍यांचा रस्ता तसा कठीण आहे. पदोपदी त्यांना संघर्ष करावा लागतो. असे असले, तरी भगवंताची अशांवरच कृपा होते.

२. आश्रमात आल्याने मला पुष्कळ प्रसन्न वाटले आणि शांतीचा अनुभव आला.

३. गोव्यासारख्या भूमीत इतका अद्भुत आश्रम ! तिथे ‘ॐ’सारखे स्वयंभू चिन्ह उमटणे, हे अलौकिक आहे.

४. हा आश्रम म्हणजे सायुज्य मुक्तीचे केंद्रच आहे. (सायुज्य मुक्ती म्हणजे भगवंताशी एकरूप होऊन मुक्ती मिळणे अथवा भक्त ज्या देवतेची उपासना करतो, त्याच्यामध्ये तो विलीन होतो.)

आश्रमाला भेट दिल्यामुळे माझे गोव्याला येण्याचे सार्थक झाले !

मी गोव्यात कथावाचनाच्या कार्यक्रमासाठी आलो आहे. मी श्री. चतुर्वेदी यांचा आभारी आहे की, त्यांनी मला सनातनच्या आश्रमात आणले. येथे आल्याने माझे गोव्याला येण्याचे सार्थक झाले आहे.

‘सनातन प्रभात’चे कार्यालय पहातांना डावीकडून श्री. के.के. चतुर्वेदी, विशान सिंह राजपुरोहित, डॉ. मार्कंडेय तिवारी आणि आचार्य श्री विपीन कृष्णजी महाराज

आश्रमातील चुकांच्या फलकाची केली प्रशंसा !

या प्रसंगी महाराज म्हणाले की, आश्रमात साधक त्यांच्याकडून झालेल्या चुका फलकावर लिहितात. हे सनातन धर्माचे विशेषत्वच होय. याने सनातन धर्माचा प्रारंभ होतो आणि यानेच तो पूर्णही होतो. स्वत:कडून झालेले अपराध स्वीकारणे, हाच सनातन धर्म आहे. जो स्वत:कडून घडलेल्या चुका स्वीकारू शकत नाही, तो सनातनला (सनातन धर्माला) स्वीकारू शकणार नाही.