Tirupati Laddu Case : तिरुपती लाडूच्‍या गुणवत्तेत सुधारणा ! – आंधप्रदेशाचे मुख्‍यमंत्री नायडू

आंध्रप्रदेशाचे मुख्‍यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू

तिरुपती (आंध्रप्रदेश) – येथील भगवान व्‍यंकटेश बालाजी मंदिरातील ‘लाडू प्रसादम्’ची गुणवत्ता वाढल्‍याने अनेक भाविक भक्‍तांनी समाधान आणि आनंद व्‍यक्‍त केला, असे वक्‍तव्‍य आंध्रप्रदेशाचे मुख्‍यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी केले. तिरुमाला येथील ‘तिरुमाला तिरुपती देवस्‍थानम्’द्वारे (‘टीटीडी’द्वारे) स्‍थापन केलेल्‍या ‘वकुलमथा’ या मध्‍यवर्ती स्‍वयंपाकगृहाचे उद़्‍घाटन मुख्‍यमंत्री नायडू यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या वेळी त्‍यांनी वरील वक्‍तव्‍य केले.

नायडू म्‍हणाले की…,

१. प्रसादाचे लाडू बनवतांना वापरल्‍या जाणार्‍या घटकांचा दर्जा तपासण्‍यासाठी प्रयोगशाळा स्‍थापन करण्‍यासह आवश्‍यकता भासल्‍यास ‘आयआयटी’चा सल्लाही घेतला जाईल.

२. यापूर्वीच्‍या ‘वाय.एस्.आर्. काँग्रेस’च्‍या राजवटीत प्रसादम्‌मध्‍ये भेसळयुक्‍त तूप वापरण्‍यात आले होते.

३. लाडूच्‍या गुणवत्तेवर भाविकांनी असंतोष व्‍यक्‍त केल्‍याच्‍या अनेक घटना यापूर्वीच्‍या सरकारच्‍या काळात घडल्‍या; परंतु त्‍यांकडे दुर्लक्ष करण्‍यात आले होते.

४. मंदिराचे संरक्षक ‘टीटीडी’च्‍या वरिष्‍ठ अधिकार्‍यांसह मी नुकतीच आढावा बैठक घेतली. प्रसाद बनवतांना उत्तम दर्जाचे घटकच वापरले जातात का, याची निश्‍चिती मी स्‍वत: केली.

५. आमचे शासन कोणतीही भेसळ सहन करणार नाही.

६. ‘टीटीडी’ आणि सरकार भगवान बालाजीच्‍या पवित्रतेचे अन् पावित्र्याचे रक्षण करण्‍यासाठी येथे आहे. हीच आमची बांधिलकी आहे. आम्‍ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू.

संपादकीय भूमिका

सरकारने आता प्रसादाच्‍या लाडूंमध्‍ये करण्‍यात आलेल्‍या भेसळीसाठी उत्तरदायी असणार्‍यांना बडतर्फ करून त्‍यांच्‍यावर कठोर कारवाईही केली पाहिजे !