Boycott Bangladesh Campaign : बंगालमधील हिंदूंकडून बांगलादेशी वस्‍तूंवर बहिष्‍कार घालण्‍याची मोहीम चालू !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचा बंगालमधील हिंदूंकडून घेतला जात आहे सूड

बंगालमधील हिंदूंकडून बांगलादेशी वस्‍तूंवर बहिष्‍कार घालण्‍याची मोहीम (छायाचित्र सौजन्य : Opindia)

कोलकाता (बंगाल) – बांगलादेशातील धार्मिक अल्‍पसंख्‍यांकांवर, विशेषत: हिंदूंवर इस्‍लामी कट्टरतावाद्यांकडून होणारे अत्‍याचार आणि आक्रमणे यांच्‍या विरोधात  बंगालचे हिंदू आता एकत्र येत आहेत. बंगालमधील हिंदू स्‍थानिक पातळीवर बांगलादेशी मुसलमान घुसखोरांना धडा शिकवत आहेतच; पण अधिकृत माध्‍यमांद्वारे बांगलादेशातून येणार्‍या मालावर बहिष्‍कार टाकत आहेत. बंगालच्‍या हिंदूंनी #BoycottBangladesh नावाची मोहीम आरंभली आहे.

१. ‘बांगलादेश आऊट’ मोहिमेचा उदय या वर्षी ५ ऑगस्‍टला झाला. बांगलादेशातील हिंदु समाजावर, त्‍यांची मंदिरे आणि व्‍यवसाय यांच्‍यावर आक्रमणे चालू झाली, तेव्‍हा बंगालमधील हिंदूंनीच शेजारच्‍या देशात बनवलेल्‍या वस्‍तू आणि सेवांवर आर्थिक बहिष्‍कार टाकला.

२. या मोहिमेचे आयोजक मयुख पाल यांनी सांगितले की, प्रारंभी हे आंदोलन अनौपचारिक होते. लोक स्‍वबळावर सहभागी होऊ लागले. निधी गोळा केला आणि अवघ्‍या महिन्‍याभरात हे आंदोलन १२ जिल्‍ह्यांमध्‍ये पसरले.

३. मयुख पाल आणि त्‍यांचे सहकारी यांनी बांगलादेशी वस्‍तूंवर बहिष्‍कार टाकण्‍यासंबंधी भित्तीपत्रके छापली आहेत आणि ती संपूर्ण राज्‍यातील सर्वांत व्‍यस्‍त भागात लावली आहेत. बस स्‍टँड, रेल्‍वे स्‍थानके आणि बाजारपेठा अशा गजबजलेल्‍या भागांत ही भित्तीपत्रके कलावण्‍यात आली आहेत. त्‍यांनी २ सहस्र ५०० हून अधिक भित्तीपत्रके वितरित केली आणि १ लाखाहून अधिक हिंदूंना याविषयी माहिती दिली. या मोहिमेतील स्‍वयंसेवकांनी लोकांशी संपर्क साधला, त्‍यांना बांगलादेशातील परिस्‍थितीबद्दल माहिती दिली आणि त्‍या देशातील उत्‍पादनांवर बहिष्‍कार घालण्‍याची शपथ घेण्‍यास प्रवृत्त केले. ‘बांगलादेशी कपडे आणि अन्‍य साहित्‍य वापरणार नाही’, अशी शपथ अनेकांनी घेतली.

४. बांगलादेश सरकारने दुर्गापूजेच्‍या काळात भारतात तेथील पद्मा नदीतील हिलसा मासे पाठवण्‍याची परंपरा बंद केल्‍याचे वृत्त होते; मात्र नंतर हा निर्णय मागे घेण्‍यात आला. असे असूनही बंगाली हिंदूंनी स्‍पष्‍ट केले आहे की, त्‍यांच्‍यासाठी मासे नव्‍हे, तर हिंदूचे जीवन सर्वांत महत्त्वाचे आहे. बंगाली हिंदूंनी ‘बांगलादेशातील ‘हिलसा’ मासे खाणार नाही’, अशी शपथही घेतली.

५. काही कनिष्‍ठ डॉक्‍टर आणि विद्यार्थी हेही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. एक डॉक्‍टर म्‍हणाले, ‘‘बांगलादेशातील हिंदूंची परिस्‍थिती अत्‍यंत चिंताजनक आहे. महिलांवर  अत्‍याचार होत आहेत. हिंदूंची मंदिरे उद़्‍ध्‍वस्‍त होत आहेत. त्‍यामुळे आम्‍ही बांगलादेशावर बहिष्‍कार टाकत आहोत.’’

बहिष्‍काराची भित्तीपत्रके लावताना बंगालचे हिंदू (छायाचित्र सौजन्य : Opindia)

बंगालच्‍या हिंदूंच्‍या ४ मागण्‍या

या मोहिमेशी संबंधित हिंदु कार्यकर्ते आर्. बंगोपाध्‍याय यांनी बंगाली हिंदूंच्‍या ४ प्रमुख मागण्‍या मांडल्‍या आहेत. यांत बांगलादेशी नागरिकांना व्‍हिसा देणे तात्‍काळ थांबवावे, भारतात राहून भारतविरोधी कारवायांमध्‍ये गुंतलेल्‍या बांगलादेशी नागरिकांची देशातून हकालपट्टी करण्‍यात यावी, हिंदूंविरुद्ध द्वेष पसरवणार्‍या कट्टरपंथी इस्‍लामी संघटनांना काळ्‍या सूचीत टाकावे आणि बांगलादेशात उत्‍पादित होणार्‍या उत्‍पादनांवर बहिष्‍कार टाकणे, या प्रमुख मागण्‍या आहेत.
बंगोपाध्‍याय म्‍हणाले की, पहिल्‍या ३ मागण्‍या भारत सरकारसाठी आहेत, तर चौथी मागणी हिंदु समाजासाठी आहे.

भित्तीपत्रकांवर काय लिहिले आहे ?

या भित्तीपत्रकांत ‘हिंदूंच्‍या रक्‍ताने माखलेल्‍या बांगलादेशी कपड्यांवर बहिष्‍कार घाला’, असे आवाहन करण्‍यात आले आहेत. यात झारा, एच् अँड एम्, जी.ए.पी. यांसारख्‍या बांगलादेशी आस्‍थापने उत्‍पादित करत असलेल्‍या साहित्‍यांचा समावेश आहे. बांगलादेशातून भारतात आयात करण्‍यात येणार्‍या कपड्यांची सूचीही आहे. त्‍यात साड्या, चुडीदार, टी-शर्ट, शर्ट, जीन्‍स, स्‍वेटर आणि लुंगी यांचा समावेश आहे.

बहिष्‍काराचे भित्तीपत्रक (छायाचित्र सौजन्य : Opindia)

या मोहिमेद्वारे बांगलादेशातील हिंदु समाजावर होत असलेले अत्‍याचार दडपण्‍याचा आणि लपवण्‍याचा प्रयत्न सामाजिक माध्‍यामांतून पसरवण्‍यात येणार्‍या भ्रामक प्रचारातून केला जात आहे. यापासून बंगाली हिंदु समाजाने सावध रहावे, असे आवाहनही करण्‍यात येत आहे.

अनेक व्‍हिडिओंमध्‍ये बंगालमधील हिंदू बांगलादेशी कपड्यांवर बहिष्‍कार टाकतांना दिसत आहेत. जनतेचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

संपादकीय भूमिका

बंगालमधील हिंदूंकडून देशभरातील हिंदूंनी बोध घेतला पाहिजे !