Lebanon Calls On India To Help : पश्‍चिम आशियातील परिस्‍थिती भारत हाताळू शकतो ! – लेबनॉन

लेबनॉनचे भारतातील राजदूत डॉ. राबी नार्श

बेरूत (लेबनॉन) – पश्‍चिम आशियातील अशांततेच्‍या पार्श्‍वभूमीवर लेबनॉनचे भारतातील राजदूत डॉ. राबी नार्श यांनी सांगितले, ‘परिस्‍थिती हाताळण्‍यात भारत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.’ यापूर्वी इराणच्‍या राजदूताने असेही म्‍हटले होते की, गाझामधील आक्रमणे थांबवण्‍यासाठी भारत इस्रायलला पटवून देऊ शकतो.

राजदूत डॉ. राबी नार्श म्‍हणाले की, आम्‍ही आमच्‍या मित्राला (भारताला) इस्रायल सरकारवर दबाव आणण्‍याचे आवाहन केले आहे जेणेकरून संघर्ष संपुष्‍टात येईल. आम्‍ही त्‍यांना सांगितले, ‘आम्‍हाला इस्रायलशी चांगले संबंध हवे आहेत आणि हा संघर्ष संपवायचा आहे.’ भारत लवकरच लेबनॉनला वैद्यकीय आणि मानवतावादी साहाय्‍य पाठवेल. लेबनॉनमधील परिस्‍थिती अत्‍यंत वाईट आहे आणि आमचे सरकार वर्ष २००६ मध्‍ये संमत झालेल्‍या संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेच्‍या ठरावाची कार्यवाही करण्‍यास सिद्ध आहे. त्‍यानुसार इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्‍यातील शत्रुत्‍व संपुष्‍टात येऊ शकते.

संपादकीय भूमिका

जे देश युक्रेन, गाझा आणि लेबनॉन येथील युद्धांवर भारताच्‍या साहाय्‍याची अपेक्षा करतात त्‍यांनी कधी भारतात हिंदूंविरोधात पाकिस्‍तान करत असलेल्‍या आतंकवादी कारवायांत भारताला साहाय्‍य केले होते का ?