MahaKumbh Snan : महाकुंभात स्नान करण्‍यासाठी येणार्‍यांचे आधारकार्ड तपासा ! – आखाड्यांची मागणी

महाकुंभमध्‍ये ‘शाही’ ऐवजी ‘राजसी स्नान’ म्‍हटले जाणार

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील महाकुंभात ‘शाही स्नाना’ला आता ‘राजसी स्नान’ म्‍हटले जाईल. महाकुंभमध्‍ये सहभागी होणार्‍या संतांना ओळखपत्रही देण्‍यात येणार आहे. जे देश-विदेशांतून कुंभ स्नानासाठी येतात, त्‍यांनाही आधारकार्ड किंवा अन्‍य ओळखपत्र आणावे लागणार आहे, असा निर्णय ८ आखाड्यांच्‍या संतांनी मिळून स्नान सुरक्षित करण्‍यासाठी घेतला आहे. यासह अन्‍य काही महत्त्वाचे निर्णयही घेण्‍यात आले आहेत.

प्रयागराजमधील दारागंज येथील निरंजनी आखाड्याच्‍या मुख्‍यालयात आखाडा परिषदेचे अध्‍यक्ष महंत रवींद्र पुरी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी परिषदेचे महासचिव हरिगिरिजी महाराज यांच्‍यासह ८ आखाड्यांचे संत उपस्‍थित होते. या बैठकीत ‘लव्‍ह जिहाद’, गायीला ‘राष्‍ट्रमाता’ घोषित करणे, तसेच कुंभमेळ्‍यात उर्दू आणि फारसी शब्‍द काढून सनातन संस्‍कृतीच्‍या आधारे नाव ठेवण्‍यावर निर्णय घेण्‍यात आले.

आखाडा परिषदेचे अध्‍यक्ष महंत रवींद्र पुरी म्‍हणाले की, सध्‍या अनेक देशांमध्‍ये युद्धजन्‍य परिस्‍थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्‍थितीत प्रत्‍येक व्‍यक्‍तीची तपासणी केली पाहिजे. प्रत्‍येक व्‍यक्‍तीकडे आधारकार्ड आणि अन्‍य ओळखपत्र असणे आवश्‍यक आहे. जर कुणी संशयास्‍पद असेल किंवा कुणी आमच्‍या धर्माविरुद्ध वर्तन करत असेल, तर त्‍याला कुंभमेळ्‍यातून हाकलून द्यावे. महाकुंभ परिसरात मांस आणि दारू यांच्‍या विक्रीच्‍या दुकानांवर बंदी घालावी. मठ आणि मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्‍त झाली पाहिजेत.