कुटुंब व्यवस्था ढासळल्यामुळे भारतीय संस्कृतीचा र्हास ! – महेंद्र महाजन, मुख्य न्यायाधीश, पुणे जिल्हा सत्र न्यायालय
‘महिलांचे हक्क-मध्यस्थ केंद्रांची भूमिका’ या विषयावर आयोजित चर्चासत्र !
पुणे – पालटत्या परिस्थितीमुळे कुटुंबे छोटी होत आहेत. त्याचे परिणाम मुलांच्या संस्कारांवर होत आहेत. कुटुंबव्यवस्था टिकली, तरच खर्या अर्थाने भारतीय संस्कृती टिकू शकेल; परंतु वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे निर्माण होणार्या कलहामुळे कुटुंबव्यवस्था ढासळत असून, त्यामुळे एक प्रकारे भारतीय संस्कृती लोप पावत आहे, अशी खंत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी व्यक्त केली. ‘नांदेड सिटी’मध्ये सासू-सून संमेलन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा आणि सत्र न्यायालय पुणे, भारतीय स्त्रीशक्ती, नांदेड सिटीच्या वतीने ‘महिलांचे हक्क-मध्यस्थ केंद्रांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
महाजन पुढे म्हणाले की, समाज जरी पुढारलेला असला, तरीही महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार थांबलेले नाहीत. आज केवळ त्या अन्याय आणि अत्याचारांचे स्वरूप पालटलले आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महिलांनी कायद्याविषयी अधिक जागरूक असले पाहिजे.