थोडक्यात महत्त्वाचे
६ ऑक्टोबरला आरे-बीकेसी टप्पा खुला !
मुंबई – मुंबईतील पहिल्या ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे-बीकेसी टप्प्याचे लोकार्पण ५ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता आरे-बीकेसी टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे.
सागरी जिवांसह मानवाची हानी !
मुंबई उच्च न्यायालयाकडून प्लास्टिकविषयी चिंता व्यक्त
मुंबई – समुद्रातील माशांच्या आतड्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळतात. हे मासे नागरिक खातात. समुद्रात किंवा समुद्रकिनारी टाकण्यात येणार्या प्लास्टिकमुळे सागरी जिवांसह मानवाचीही हानी होत आहे, असे सांगत मुंबईतील समुद्रकिनार्यांवरील कचर्याच्या प्रदूषणाविषयी मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. या प्रदूषणाची नोंद घेऊन या प्रकरणी स्वतःहून जनहित याचिका प्रविष्ट करण्याचे स्पष्ट केले. मुंबईस्थित केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेने याविषयी अभ्यास करून वरील स्वरूपाचे गंभीर निरीक्षण नोंदवले होते.
संपादकीय भूमिका : प्लास्टिकच्या कचर्याचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता सरकारने पुन्हा एकदा प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र करायला हवी !
पोलिसांच्या नावाने बनावट ‘एक्स’ खाते !
नवी मुंबई – नवी मुंबई पोलिसांच्या नावाने बनावट ‘एक्स’ खाते चालू करण्यात आले आहे. या प्रकरणी स्वतः नवी मुंबई पोलिसांनीच अज्ञाताविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. गेल्या ४ वर्षांपासून हे खाते अस्तित्वात आहे. (इतकी वर्षे नवी मुंबई पोलीस काय झोपा काढत होते का ? – संपादक)
धुळे येथे १ कोटी रुपयांचा गांजा जप्त !
धुळे – पोलिसांनी धाड घालून ट्रॅक्टर ट्रॉलीसह १ कोटी २५ लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. मोहन साबळे असे त्याचे नाव आहे.
संपादकीय भूमिका : समाजाला व्यसनाधीन करणार्यांना कारागृहातच डांबायला हवे !
दगडफेकीत ९ पोलीस कर्मचारी घायाळ !
पारोळा (जिल्हा जळगाव) – येथे बालाजी वहनोत्सव मिरवणुकीत क्षुल्लक कारणामुळे झालेल्या वादात २ गटांत दगडफेक झाली. यात ९ पोलीस घायाळ झाले. या प्रकरणी २४ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांचा बंदोबस्त तोकडा असल्याने दंगल नियंत्रक पथक मागवावे लागले. (पोलीसच घायाळ होत असतील, तर सामान्यांची सुरक्षा कोण करणार ? – संपादक)