शाळा, महाविद्यालये येथे ‘कुराण मार्गदर्शन’ या बेकायदेशीर मोहिमेला अनुमती देऊ नये !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीची मागणी
सोलापूर – ‘स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ ही संघटना सर्व शाळा, महाविद्यालये येथे ‘कुराण’चे मार्गदर्शन करण्याकरिता मोहीम राबवत आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृतींमुळे अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रयत्नांना प्रतिबंध घालावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने एका निवेदनाद्वारे देण्यात आली. या वेळी श्री. दत्तात्रय पिसे, अधिवक्ता चंद्रकांत वारद, अधिवक्ता रमेश पाटील इत्यादी उपस्थित होते. सदर मागण्यांचे निवेदन सोलापूर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, निबंधक, अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर आणि शिक्षणाधिकारी, सोलापूर महानगरपालिका यांना देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शाळा आणि महाविद्यालयांत धार्मिक मार्गदर्शन करण्याच्या संदर्भात कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध नाहीत. याविषयी शासन निर्णय नाही किंवा शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांची अनुमती नाही. त्यामुळे सदर संघटनेला धार्मिक मार्गदर्शन करण्याची अनुमती दिली, तर इतर धार्मिक संघटनांनासुद्धा त्यांच्या धर्माचे मार्गदर्शन करण्याची अनुमती द्यावी लागेल. यातून धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संघटनेला लेखी समज त्वरित देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात का येत नाही ? |