पोहरादेवी (वाशिम) येथे नगारा भवनाचे पंतप्रधानांकडून लोकार्पण !
वाशिम – काँग्रेसला केवळ जनतेची लूट कशी करायची, हेच ठाऊक आहे. काँग्रेस गरिबांना आणखी गरीब करत आहे. गरीब भारत हा काँग्रेसच्या राजकारणासाठी लाभदायक आहे. शहरी नक्षलवादालाही काँग्रेस प्रोत्साहन देत आहे. देशातील तरुणांना अमली पदार्थ विकून त्या पैशांतून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. त्यामुळे जनतेने काँग्रेसापासून सावध रहावे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. वाशिममध्ये बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीचे दर्शन घेतल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या वेळी त्यांनी पोहरादेवी येथे नगारा भवनाचेही लोकार्पण केले.
ते म्हणाले की, देहलीत काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ पकडले गेले. या अमली पदार्थांची यंत्रणा चालवणारा मुख्य सूत्रधार हा काँग्रेसचा नेता असल्याचे उघड झाले आहे. काँग्रेस देशातील तरुणांना अमली पदार्थ विकून त्या पैशांतून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला या धोक्यापासून सावध रहायला हवे.