राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण !
भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे !
कोल्हापूर – काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी ५ ऑक्टोबर या दिवशी कोल्हापूर दौर्यावर आले होते. कोल्हापूर येथील कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले; मात्र राहुल गांधींच्या या दौर्याला भाजपकडून जोरदार विरोध होत आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या जवळच अडवले.
या वेळी राहुल गांधी यांनी भाषणात सांगितले की, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करत आहोत. हा केवळ एक पुतळा नाही. आपण एखाद्या व्यक्तीचा पुतळा सिद्ध करतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या विचारांचे आपण मनाने समर्थन करतो. आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले; पण आता आपल्याला त्यांच्या विचारांसाठी संघर्षही करावा लागेल. त्यामुळे आपण आज छत्रपतींच्या विचारांनुसार मार्गक्रमण केले पाहिजे. (विदेशात जाऊन भारतविरोधी वक्तव्य करणार्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्या, भारतद्रोहींची साथ देणार्या राहुल गांधींच्या तोंडी छत्रपती शिवरायांविषयी बोलणे शोभत नाही ! – संपादक)