हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंना सक्रीय करणार्या ‘हिंदु जनजागृती समिती’चे वृद्धींगत झालेले दैवी कार्य !
‘वर्ष २००२ मध्ये घटस्थापनेच्या शुभमुहुर्तावर हिंदु जनजागृती समितीची स्थापना झाली. कोरोना महामारीच्या आपत्तीचा अपवाद वगळला, तर प्रत्यक्ष स्तरावर कार्य करण्यात हिंदु जनजागृती समितीचा नेहमीच पुढाकार असतो. कोरोना महामारीच्या आपत्तीतही घरात बसलेल्या प्रत्येक हिंदूच्या हृदयामध्ये हिंदु राष्ट्राच्या ज्योतीचे एका मशालीत रूपांतर करण्यासाठी आणि त्यांना कृतीशील करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचा पुढाकार होता. म्हणूनच हिंदु जनजागृती समितीने कोरोनाच्या आपत्तीपूर्वी जे उपक्रम प्रत्यक्ष समाजात चालू होते, तेच उपक्रम आधुनिक माध्यमांतून ‘ऑनलाईन’ चालू करण्याचा प्रयत्न केला. याची दृश्य रूपातील फलनिष्पत्ती कोरोना महामारीच्या आपत्तीनंतर दिसू लागली आहे.
भाग १.
१. कोरोना महामारीच्या काळात चालू केलेले अभिनव ऑनलाईन उपक्रम
१ अ. धर्म आणि समाजजीवन यांवरील ‘ऑनलाईन’ प्रश्नोत्तर संवाद – ‘धर्मसंवाद’ : कोरोना महामारी काळात समाजाला घरबसल्या धर्मशिक्षण मिळण्यासाठी ‘धर्मसंवाद’ हा अभिनव कार्यक्रम समितीने स्वतःच्या ‘यू ट्यूब’ चॅनेलवर प्रतिदिन चालू केला. धर्म आणि समाजजीवन यांविषयी समाजमनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे, असे त्याचे स्वरूप होते. या कार्यक्रमाच्या अंतर्गत समाजमनातील प्रश्नांची उत्तरे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे देत. या कार्यक्रमातून सण, व्रते आणि उत्सव यांविषयी धर्मशास्त्रीय दृष्टीकोन; कर्मयोग, नामसंकीर्तनयोग, आचारधर्म यांविषयी हिंदु बांधवांना धर्मशिक्षण मिळाले. हे सर्व ऑनलाईन असल्याने कायमस्वरूपी ते यू ट्यूबवर संग्रहित झाले. त्यामुळे समाज कधीही ते पाहू शकतो आणि त्यातून दिशा घेऊ शकतो.
१ आ. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात ‘ऑनलाईन’ वैचारिक चर्चा – ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ ! : याच काळात समितीने स्वतःच्या ‘यू ट्यूब’ चॅनेलवर ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ (चर्चा हिंदु राष्ट्राची), हा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात वैचारिक चर्चा करणारा कार्यक्रम चालू केला. या कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्र-धर्मावरील संकटांच्या संदर्भात प्रतिदिन घडत असलेल्या चालू घडामोडी, उदा. धर्मविरोधी वक्तव्ये, शासनाचे हिंदुविरोधी धोरण, मंदिर-संस्कृती रक्षण, हिंदु संत-परंपरा यांचा अपमान, लव्ह जिहाद, धर्मांतर, हलाल जिहाद इत्यादी विविध विषयांवर वैचारिक चर्चा आयोजित करण्यात आल्या. या चर्चांमधून केवळ कार्यक्रम न होता हिंदूंना दिशादर्शन झाले. हे चर्चासत्र, म्हणजे ‘आक्षेपांचे खंडण कसे करावे ?’, याविषयी आत्मविश्वास वाढवणारा स्रोत होता. ‘धर्मावरील आघातांना प्रतिउत्तर कसे द्यावे ?’, हे शिकवणारी प्रतिदिनची कार्यशाळाच होती. ही चर्चा म्हणजे हिंदुत्वनिष्ठ विचारवंतांचे व्यासपीठ झाले. या माध्यमातून वैचारिक स्तरावर हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करणारे प्रवक्ते, विचारवंत आणि संत यांचेही संघटन झाले. याची फलनिष्पत्ती, म्हणजे पुढे हिंदु विचारवंतांच्या देहली, मुंबई, रांची (छत्तीसगड) आणि बेंगळुरू (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात वैचारिक परिषदांचे आयोजन झाले.
१ इ. हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे ‘ऑनलाईन’ आयोजन : कोरोना महामारीच्या पूर्वी समाजात अनेक ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभांना प्रचंड प्रतिसाद होता. ही आपत्ती आल्याने प्रत्यक्ष सभा घ्यायला अडचणी होत्या. कोरोना महामारीचा काळ असला, तरी हिंदु धर्मावरील आघात थांबण्याचे नाव कुणी घेत नव्हते. त्यामुळे हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्याचे ठरले. या उपक्रमामुळे आपत्काळातही हिंदु राष्ट्राच्या विचारधारेच्या प्रचाराचे कार्य ईश्वरी कृपेने झाले. या सभेला सहस्रो लोक जोडले जात होते. ‘या सभांतून मिळालेले जिज्ञासू आज हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी झाले आहेत’, ही केवळ भगवंताचीच कृपा आहे.
१ ई. ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे ‘ऑनलाईन’ आयोजन : हिंदुत्वनिष्ठांमध्ये राष्ट्रव्यापी समन्वय व्हावा, या हेतूने प्रतिवर्षी समिती अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करत असते. दळणवळण बंदीच्या काळात ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन झाले नाही, तर सर्वांशी समन्वय करायला अडचणी येऊ शकतील’, ही अडचण लक्षात घेऊन वर्ष २०२० मध्ये ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ ऑनलाईन घेण्याचे सुनिश्चित करण्यात आले. या अधिवेशनाला केवळ देशातीलच नव्हे, तर विदेशातीलही अनेक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. सलग ७ दिवस प्रतिदिन ३ घंटे हे अधिवेशन आयोजित केले जात होते. याला राष्ट्रीय स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत सर्वच जण ऑनलाईन जोडले होते. त्यामुळे एकाच वेळी विषय सर्वत्र पोचवणे आणि दिशा देणे सोपे झाले. या अधिवेशनाला २ सहस्रांहून अधिक कृतीशील हिंदुत्वनिष्ठ आणि विचारवंत ऑनलाईन सहभागी झाले होते. हा प्रतिसाद पूर्वी झालेल्या प्रत्यक्ष अधिवेशनांच्या उपस्थितीपेक्षाही अधिक होता.
२. कोरोना महामारीपूर्वी जोडलेल्या धर्मप्रेमींना सक्रीय करण्यासाठी त्या काळात राबवलेले अभिनव उपक्रम
२ अ. धर्मप्रेमींना कायद्याविषयी माहिती देणार्या ‘ऑनलाईन’ कार्यशाळांचे आयोजन : कोरोना महामारीपूर्वीच्या धर्मजागृतीच्या कार्यातून अनेक धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ विचारांचे अधिवक्ताही जोडले गेले होते.
कोरोना महामारीच्या काळात या दोन्ही गटांना सक्रीय ठेवणे आणि धर्मप्रेमींना कायद्याचे प्रशिक्षण देणे यांसाठी जिल्ह्याजिल्ह्यांत ऑनलाईन ‘माहिती अधिकार कार्यशाळा’ आणि ‘कायदा प्रशिक्षण कार्यशाळा’ यांचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळांचा लाभ, म्हणजे सर्व जण प्रशिक्षित झाल्यामुळे प्रत्यक्ष कार्य करतांना त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सर्व जण त्यांचा कौशल्य विकास झाल्याचे अनुभवत आहेत.
२ आ. धर्मरक्षणासाठी अभिनव ‘ऑनलाईन’ आंदोलने : दळणवळण बंदीच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करणे अशक्य होते; मात्र ‘ट्विटर’ (आताचे ‘एक्स’) आणि फेसबुक यांच्या ‘ट्रेंड’च्या माध्यमातून (सामाजिक माध्यमांतील चर्चा) चळवळी होऊ शकतात, हे हिंदु जनजागृती समितीच्या लक्षात आले. याच काळात देशातील ‘अर्बन (शहरी) नक्षलवाद्यां’नी भारतात हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार आहे, तर त्या विरोधात अमेरिकेत ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व कॉन्फरन्स’चे (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन परिषद) आयोजन केले होते. यात अमेरिकेतील नामांकित ४० हून अधिक विद्यापिठे सहभागी झाली होती. या संदर्भात समितीने देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संस्थांच्या नेत्यांची ‘ऑनलाईन’ बैठक घेऊन विरोध करण्याचे ठरवले. या बैठकीत कार्यक्रम रहित करण्यासाठी संगणकीय पत्र (इ-मेल) पाठवणे, परिषदेचा निषेध करणारे हस्तफलक हातात घेऊन त्यांची छायाचित्रे आणि चलचित्रे (‘व्हिडिओ’) मोठ्या प्रमाणात संबंधित अधिकार्यांना पाठवणे, ‘ट्विटर ट्रेंड’ करणे, फेसबुक लोकप्रचार (कॅम्पेनिंग) करणे इत्यादी कृती सुनिश्चित करण्यात आल्या.
पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या ऑनलाईन आंदोलनांत १३ देश, भारतातील २५ राज्ये, १४० हून अधिक शहरांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होते. समाजातूनही उत्स्फूर्तपणे लोक सहभागी झाले. कॅनडामध्ये १५० संघटनांनी याला विरोध केला. मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने काही विद्यापिठांनी या परिषदेच्या आयोजनातून माघार घेतली. कार्यक्रमालाही अल्प प्रतिसाद मिळाला. हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून याला विरोध झाला. याची नोंद सर्वत्र घेतली गेली. या कालावधीतील ‘ट्विटर ट्रेंड’ वैश्विक पातळीवर पहिल्या ५ मध्ये आला होता. ‘आपत्काळ असो, नाहीतर सामान्य काळ असो, भगवंत कुणाच्याही माध्यमातून काहीही करू शकतो’, याची साक्षच पुन्हा मिळाली. त्यानंतर या काळात अशा विविध विषयांवर ऑनलाईन आंदोलने झाली आणि त्यांची नोंदही प्रसारमाध्यमांतून घेतली गेली.
३. कोरोना काळात इतरांच्या कार्यक्रमातील ऑनलाईन सहभाग
कोरोना महामारीच्या काळात सर्वच ठप्प असतांना अनेक लोकप्रिय हिंदुत्वनिष्ठ ‘यू ट्यूब चॅनेल्स’वर राष्ट्र-धर्माविषयीची चर्चासत्रे चालू झाली. हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांनाही या कार्यक्रमांमध्ये वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले. अमेरिका आणि अरब राष्ट्रांतील धर्मप्रेमी व्यक्तींनी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांतही समितीचे वक्ते सहभागी झाले. परिणामी त्या देशांतील हिंदुत्वनिष्ठांच्या ओळखी होण्यास साहाय्य झाले.
कोरोना महामारीच्या काळात ‘हिंदुजागृती’ या ‘यू ट्यूब चॅनेल’ची वाढलेली लोकप्रियता !हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदुजागृती’ या अधिकृत ‘यू ट्यूब चॅनेल’वर अनेक ‘ऑनलाईन’ कार्यक्रम आयोजित झाल्याने या चॅनेलचा मोठ्या प्रमाणात प्रचार झाला. कोरोना महामारीपूर्वी १० वर्षे कार्यरत असूनही ३२,००० सभासदसंख्या असलेल्या ‘हिंदुजागृती’ चॅनेलची अवघ्या वर्षभरात १ लाख सभासदसंख्या झाली. सभासदसंख्या १ लाखांहून अधिक झाल्यानंतर ‘गूगल’ आस्थापनाने ‘हिंदुजागृती’ या ‘यू ट्यूब चॅनेल’ला ‘सिल्व्हर ट्रॉफी’ने पुरस्कारित केले. ‘हिंदुजागृती’ चॅनेलची दळणवळण बंदीचा काळ आणि त्यानंतरच्या काळात वाढत गेलेली सभासदसंख्या बाजूच्या सारणीत दिली आहे. कोरोनाच्या या आपत्काळात अल्प मनुष्यबळ आणि अल्प साधनसामुग्री असतांनाही हे सर्व होणे, ही केवळ भगवंताच्या कृपेची अनुभूती होती. दळणवळण बंदीच्या काळात सर्वच उपक्रम आणि आंदोलने ‘ऑनलाईन’ परिणामकारक होण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेणार्या हिंदु जनजागृती समितीच्या ‘आयटी विंग’च्या साधकांप्रती कृतज्ञता !दळणवळण बंदी काळात धर्मजागृतीचे सर्व उपक्रम आणि आंदोलने यांचे आयोजन ‘ऑनलाईन’ असल्याने, तसेच ते परिणामकारक होणे आवश्यक असल्याने समितीच्या ‘आयटी विंग’च्या (माहिती-तंत्रज्ञान शाखेच्या) साधकांनी पुष्कळ परिश्रम घेतले. अनेकांनी या काळात रात्रंदिवस सेवा केली. या उपक्रमांसाठी आवश्यक चित्रीकरण करणे, ध्वनीचित्र-संकलन करणे, कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करणे, ऑनलाईन आंदोलनाची पूर्वसिद्धता करणे इत्यादी विविध सेवांमध्ये या सर्व साधकांचे कौशल्य वाढले. या सेवांमुळे अनेक साधक तांत्रिक कौशल्यांमध्ये पारंगत झाले आणि त्याचा सेवेसाठी प्रभावीपणे उपयोगी करू लागले. त्यामुळे सेवेची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढली. या सर्व ‘आयटी विंग’च्या साधकांप्रती अनंत कृतज्ञता ! – श्री. सुनील घनवट |
४. कोरोना काळात हरिद्वार कुंभमेळ्यात केलेले हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य !
पहिली कोरोना महामारीची लाट संपल्यानंतर जीवन पूर्ववत् होत असतांना धर्मप्रचाराची मोठी संधी म्हणून हरिद्वारच्या कुंभमेळ्यात समितीने धर्मप्रचार करायचे ठरवले. यासाठी समितीचे भारतभरातील १३० हून अधिक साधक, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी दृढ श्रद्धा ठेवून जिवावर उदार होऊन धर्मसेवेसाठी आले. या वेळच्या कुंभमेळ्यात साधक संख्या अल्प असतांनाही नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात धर्मप्रसाराचे कार्य झाले.
हिंदु राष्ट्र स्थापनेचे हिंदु जनजागृती समितीने प्रचारित केलेले विचारच अनेक संतांनी कार्यक्रम आणि बैठका यांमध्ये व्यापक स्तरावर घेतले. या कुंभमेळ्यातच एका संतांच्या बैठकीत ‘हिंदु राष्ट्राची राज्यघटना’ बनवण्याचे नियोजन झाले, तसेच काही संतांनी हरिद्वारच्या चौकाचौकांत ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा’, असे ‘बॅनर’ (फलक) लावले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्राची गुढी’ याच कुंभमेळ्यात उभारली गेली. हिंदु जनजागृती समितीने ‘हिंदु राष्ट्र प्रदर्शन’ लावले. याला अनेक संतांनी स्वतःहून भेट दिली. हिंदु राष्ट्र स्थापनेचा विचार सांगण्यासाठी ‘संत-संपर्क अभियान’ आयोजित करण्यात आले. यातून अनेक संत समितीच्या कार्याशी जोडले गेले.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती.
भाग २. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/843634.html