AIIMS Nagpur Death Rate Doubled : नागपूर येथील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संस्थे’त ५ वर्षांत दुपटीने वाढले मृत्यू !
नागपूर – येथील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संस्थे’मध्ये (‘एम्स् नागपूर’मध्ये) वर्ष २०२० ते जुलै २०२४ या ५ वर्षांत रुग्णांच्या मृत्यूची संख्या दुपटीने वाढली आहे. वर्ष २०२० मध्ये २५ मृत्यू झाले होते. ती संख्या वर्ष २०२३ मध्ये १ सहस्र १९ इतकी झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागितलेल्या माहितीत हे वास्तव उघड झाले आहे. ‘एम्स्’ ही एक वैद्यकीय संशोधन सार्वजनिक उच्च शिक्षण संस्था आहे. जुलै २०१४ मध्ये घोषित केलेल्या फेज-४’ ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसपैकी ती एक आहे.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये वर्ष २०२१ मध्ये ३०६, वर्ष २०२२ मध्ये ६८८, वर्ष २०२३ मध्ये १ सहस्र १९ आणि जुलै वर्ष २०२४ पर्यत ७५६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यासह वर्ष २०१९ मध्ये बाह्य रुग्ण विभागात १ लाख ५ सहस्र ६६७, वर्ष २०२० मध्ये ८७ सहस्र २३२, वर्ष २०२१ मध्ये १ लाख ९१ सहस्र ७३९, वर्ष २०२२ मध्ये ३ लाख ८६ सहस्र ९०१, वर्ष २०२३ मध्ये ५ लाख ५७ सहस्र ९२ आणि जुलै २०२४ पर्यंत ३ लाख ८७ सहस्र ४९७ रुग्णांची पडताळणी करण्यात आली.