Sai Baba Statues Removed : वाराणसी येथील मंदिरांतून साईबाबांच्‍या मूर्ती हटवणारे सनातन रक्षक दलाचे प्रदेशाध्‍यक्ष अजय शर्मा यांना अटक

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील मंदिरांतून साईबाबांच्‍या मूर्ती हटवणारे सनातन रक्षक दलाचे प्रदेशाध्‍यक्ष अजय शर्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्‍यांच्‍यावर गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

१. पोलीस उपायुक्‍त गौरव बन्‍सवाल यांनी सांगितले की, सनातन रक्षक दलाचे प्रदेशाध्‍यक्ष अजय शर्मा यांना शांतता भंग केल्‍याच्‍या आरोपाखाली अटक करण्‍यात आली आहे. आनंदमाई मंदिराच्‍या पुजार्‍याने अजय शर्मा यांच्‍या विरोधात तक्रार केल्‍यानंतर पोलिसांनी गुन्‍हा नोंद करून धार्मिक परंपरा, धार्मिक स्‍थळे किंवा प्रतीकांचा अपमान करणे, शांतता भंग करणे आदी आरोपांखाली अटक केली. साई मंदिराच्‍या व्‍यवस्‍थापकांनी पोलीस आयुक्‍तांची भेट घेतली. काशीतील सर्व ७२ मंदिरांना सुरक्षा देण्‍याची मागणी त्‍या वेळी करण्‍यात आली होती.

२. सनातन रक्षक दलाने १ ऑक्‍टोबर या दिवशी वाराणसीतील १४ मंदिरांमधून साईबाबांच्‍या मूर्ती हटवल्‍या होत्‍या. ‘आणखी ६० मंदिरांतील साईबाबांच्‍या मूर्ती हटवण्‍यात येणार’, असे संस्‍थेने सांगितले होते. लक्ष्मणपुरी येथेही अखिल भारतीय हिंदु महासभेने मंदिरांमधून साईबाबांच्‍या मूर्ती हटवण्‍याची मागणी केली आहे.

३. या घटनांनंतर महाराष्‍ट्रस्‍थित शिर्डी साई ट्रस्‍टने अशा घटना तातडीने रोखण्‍याची मागणी केली आहे. शिर्डी साई ट्रस्‍टचे म्‍हणणे आहे की, आम्‍ही महाराष्‍ट्र सरकारशी बोललो आहे आणि त्‍याला उत्तरप्रदेश सरकारशी या विषयावर चर्चा करण्‍यास सांगितले आहे. साईबाबांच्‍या मूर्ती हटवण्‍यावर तात्‍काळ बंदी घालावी. अशा कृतींमुळे साईभक्‍तांच्‍या भावना दुखावल्‍या जात आहेत.

महाराष्‍ट्राच्‍या निवडणुका पहाता  हे षड्‌यंत्र तर नाही ? – स्‍वामी जितेंद्रानंद सरस्‍वती

साईबाबांच्‍या मूर्ती ४ ते १० वर्षांपूर्वी मंदिरात बसवण्‍यात आल्‍या होत्‍या. ज्‍यांनी मूर्ती हटवण्‍याचे काम केले, त्‍यांना हे ठाऊक नव्‍हते का ? कि आज श्रद्धेचे रूपांतर अश्रद्धेत झाल्‍यामुळे मूर्ती हटवल्‍या जात आहेत ? महाराष्‍ट्रात विधानसभेची निवडणूक होणार असून त्‍या पार्श्‍वभूमीवर हे षड्‌यंत्र तर नाही ?, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस स्‍वामी जितेंद्रानंद सरस्‍वती यांनी वाराणसीमध्‍ये व्‍यक्‍त केली.