US Yemen Attack : अमेरिकी सैन्‍याकडून येमेनवर आक्रमण !

  • हुती आतंकवाद्यांच्‍या १५ स्‍थानांना केले लक्ष्य  

  • व्‍यापारी नौकांवरील आक्रमण थांबवण्‍यासाठी अमेरिकेची कृती

सना (येमेन) – अमेरिकी सैन्‍याने येमेनमधील हुती आतंकवाद्यांच्‍या नियंत्रणात असलेल्‍या १५ स्‍थानांवर आक्रमण केले. लाल समुद्र आणि एडनचे आखात येथे हुती आतंकवादी अमेरिकी आणि ब्रिटीश व्‍यापारी नौकांवर सातत्‍याने आक्रमण करत आहेत. हे थांबवण्‍यासाठी अमेरिकी सैन्‍याने आक्रमण चालू केले. या आक्रमणाचे लक्ष्य हुतीची क्षमता कमकुवत करणे, हे आहे.

१. अमेरिकेच्‍या या आक्रमणानंतर येमेनची राजधानी सनासह बर्‍याच ठिकाणी स्‍फोट झाल्‍याची माहिती समोर आली आहे.

२. इस्रायल-हमास संघर्षाच्‍या वेळी गाझाच्‍या समर्थनार्थ हुती आतंकवादी नोव्‍हेंबर २०२३ पासून लाल समुद्रातील व्‍यापारी नौकांवर आक्रमण करत आहेत.

३. इस्रायलनेही येमेनमध्‍ये हुती आतंकवाद्यांंवर आक्रमण चालू केले होते. हुती आतंकवाद्यांनी नुकतीच इस्रायलवर क्रूझ क्षेपणास्‍त्रे डागली होती.

४. हुती आतंकवाद्यांनी आतापर्यंत १०० व्‍यापारी नौकांवर आक्रमण केले आहे. यांपैकी २ नौका उद़्‍ध्‍वस्‍त होऊन त्‍या बुडाल्‍या आहेत.  तसेच हुती बंडखोरांनी येमेन खोर्‍यात दोन व्‍यापारी नौकांवर आक्रमण करून ती उद़्‍ध्‍वस्‍त केली होती.

५. काही दिवसांपूर्वी हुती आतंकवाद्यांनी अमेरिकेच्‍या युद्धनौकांवर आक्रमण केले होते. या आतंकवाद्यांनी इस्रायलवरही काही क्षेपणास्‍त्रे डागली आहेत.

संपादकीय भूमिका

जेव्‍हा अमेरिकेच्‍या हिताचे सूत्र पुढे येते, तेव्‍हा ती कोणताही किंतु-परंतु न बाळगता थेट आक्रमक होऊन शत्रूला धडा शिकवते. भारत असे आक्रमक धोरण कधी अवलंबणार ?