S Jaishankar Pakistan Visit : परराष्ट्रमंत्री ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या परिषदेसाठी पाकला भेट देणार !
भारत-पाक चर्चेसाठी नव्हे, तर शिखर परिषदेत उपस्थित रहाण्यासाठी पाकला जात असल्याची डॉ. जयशंकर यांची माहिती
नवी देहली – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर हे १५ आणि १६ ऑक्टोबर या दिवशी ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या (शांघाय सहकार्य संघटनेच्या) परिषदेसाठी पाकला भेट देणार आहेत. गेल्या ९ वर्षांत एखाद्या भारतीय परराष्ट्रमंत्र्याने पाकला जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. याआधी तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी वर्ष २०१५ मध्ये अफगाणिस्तानशी संबंधित एका सूत्रावर चर्चा करण्यासाठी आयोजित परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकला भेट दिली होती.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, शांघाय सहकार्य संघटना सरकारच्या प्रमुखांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी डॉ. जयशंकर एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. ‘मी भारत-पाकिस्तान चर्चेसाठी पाकिस्तानला जात नसून ही भेट शिखर परिषदेला उपस्थित रहाण्यापुरती मर्यादित असेल’, असे डॉ. जयशंकर यांनी म्हटले आहे. ऑगस्टमध्ये पाकने पंतप्रधान मोदी यांना बैठकीसाठी आमंत्रित केले होते. संघटनेची वचनबद्धता पाळण्याकरता डॉ. जयशंकर हे भारताकडून शिखर परिषदेला उपस्थित रहाणार आहेत. यातून प्रादेशिक सुरक्षा सहकार्याला चालना मिळणार आहे.
शांघाय सहकार्य संघटनेची संक्षिप्त माहिती !
भारताखेरीज शांघाय सहकार्य संघटनेत चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे सदस्य देश आहेत. या संघटनेला एक प्रभावशाली आर्थिक आणि सुरक्षा गट, तसेच सर्वांत मोठ्या आंतरराष्ट्रीय संघटनांपैकी एक म्हटले जाते. या संघटनेमध्ये सर्वांत मोठ्या दहा अर्थव्यवस्थांपैकी चीन, भारत आणि रशिया या तीन अर्थव्यवस्था असल्याने या संघटनेला विशेष महत्त्व प्राप्त आहे.