दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बनावट पारपत्रामुळे महिलेला अटक !; गरबा खेळतांना तरुणाचा मृत्यू !

बनावट पारपत्रामुळे महिलेला अटक !

मुंबई – बनावट पारपत्राच्या आधारे पोलंडला जाण्यासाठी आलेल्या तिबेटीयन महिलेस विमानतळावर पकडले. तिच्याविरुद्ध फसवुणकीसह पारपत्र कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ती १८ वर्षांपूर्वी तिबेटमधून भारतात आली होती. तेव्हापासून ती कर्नाटकात वास्तव्यास होती. बेंगळुरूमध्ये बनावट भारतीय कागदपत्रे बनवून तिने पारपत्र मिळवले. तिला बनावट भारतीय दस्तावेज कुणी बनवून दिले ? पारपत्रासाठी कुणी साहाय्य केले ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.


गरबा खेळतांना तरुणाचा मृत्यू !

जळगाव – गरबा खेळतांना लखन रमेशलाल वाधवानी (वय २७ वर्षे) याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना पाचोरा येथे ३ ऑक्टोबरच्या रात्री घडली. तो खाली कोसळल्यावर मंडळातील तरुणांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले. तेथील आधुनिक वैद्यांनी त्याला मृत घोषित केले.


‘भवानी ज्योत’ नेत असलेल्या ‘पिकअप’ला टेंपोची धडक !

सांगोला – कोल्हापूर येथून भवानी ज्योत घेऊन येतांना वाटेत थांबलेल्या ‘पिकअप’ला भरधाव टेंपोने मागून धडक दिली. या अपघातात डिकसळ (तालुका सांगोला) येथील श्री लक्ष्मीदेवी नवरात्र उत्सव मंडळाचे १२ तरुण घायाळ झाले. एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही घटना ४ ऑक्टोबरच्या पहाटे घडली.


मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर नरहरी झिरवळ यांची उडी !

मुंबई – धनगर आरक्षणाच्या जोडीला अन्य मागण्यांसाठी आदिवासी समाजाचे आमदार गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत होते. अजित पवार गटाचे आमदार किरण लहामाटे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयात प्रवेश करत तिसर्‍या मजल्यावरून संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. उड्या मारलेल्यांना जाळीवरून बाहेर काढण्यात येत होते; मात्र आमदार आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम होते.