बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करणार्या ‘जमात-ए-इस्लामी’चे जिहादी स्वरूप !
बांगलादेशातील हिंदू स्वतःच्या सुरक्षेविषयी अत्यंत घाबरले आहेत. यासह भारतीय सीमेवर काहींनी पलायन केले आहे. एका बाजूला काही कट्टरपंथियांनी त्यांच्या क्रूर हत्या केल्या. त्यानंतर बांगलादेशामधील काही हिंदु महिलांवर त्यांनी अत्याचार केला. बांगलादेशामधील आंदोलनात आणि त्यानंतरच्या हिंदूंवरील अत्याचारात ‘जमात-ए-इस्लामी’चा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘जमात-ए-इस्लामी’वर बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी बंदी घातली होती. बांगलादेशात नुकतेच महंमद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन झाले. या सरकारने ‘जमात-ए-इस्लामी’वरील बंदी उठवली आहे. त्यानंतर बांगलादेशातील हिंदु विद्यार्थी आणि नेते यांच्यासमवेत युनूस यांची एक बैठकही पार पडली. सत्तांतरानंतर हिंदूंवर झालेल्या आक्रमणाच्या संदर्भात हे पाऊल उचलण्यात आले, हे विशेष. या बैठकीत हिंदूंच्या सुरक्षेविषयी चर्चा केली गेली. या वेळी बांगलादेशी हिंदूंनी यासंदर्भात ८ विविध मागण्या केल्या आहेत, ‘ज्यामध्ये हिंदु अल्पसंख्यांकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नवा कायदा कार्यवाहीत आणावा’, ही प्रमुख मागणी केली आहे. हिंदूंवर झालेल्या आक्रमणांविषयी बांगलादेशच्या सरकारने क्षमा मागितली आहे.
अंतरिम सरकारच्या गृह विभागाचे सल्लागार एम्. शेखावत हुसैन म्हणाले ‘‘अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेत झालेली चूक, ही एक मोठी चूक आहे. ही चूक केवळ सरकारची नाही, तर सर्व कट्टरपंथियांची आहे. पोलीस आणि सैन्य दोन्हीही त्यांचे कर्तव्य बजावण्यास असक्षम ठरले आहेत.’’ असे असले, तरी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारामध्ये ‘जमात-ए-इस्लामी’ ही संघटना क्रूरकर्मा ठरली आहे. या लेखाच्या माध्यमातून ‘जमात-ए-इस्लामी’ची स्थापना, तिचा उद्देश, तिचा काळा इतिहास यांसह अन्य अनेक पैलूंचा ऊहापोह करण्यात आला आहे.
१. बांगलादेशातील परिस्थिती बिघडवण्यामागे पाकिस्तान आणि चीन यांचा हात
पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’ या गुप्तचर यंत्रणेने शेख हसीना यांच्यावर दबाव आणण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर केला. यामागे पाकिस्तानचा भारतविरोधी सरकार स्थापन करण्याचा उद्देशही होता. हसीना यांच्या विरोधात ‘आय.एस्.आय.’ने छुपे गट (स्लीपर सेल) सक्रीय केल्याची माहिती आहे. ‘आय.एस्.आय.’ ही ढाक्यातील परिस्थिती आणखी बिघडवण्यासाठी ‘जमात-ए-इस्लामी’ आणि त्यांची विद्यार्थी संघटना ‘छात्रशिबिर’ यांचा वापर करत आहे. ‘जमात-ए-इस्लामी’ ही संघटना पाकिस्तानच्या अत्यंत जवळची मानली जाते. त्यांना वेळोवेळी गुप्त निधी दिला जात आहे. त्यांना ढाक्यातील पाकिस्तानी अधिकार्यांकडून नियमित माहिती/सूचना मिळतात.
चीनच्या राज्य आणि सुरक्षा मंत्रालयानेही या आंदोलनाला पाठबळ दिले आहे. हसीना यांनी भारत आणि चीन यांच्यात कराराविषयी असो किंवा इतर काही प्रकल्पांविषयी कायम समतोल साधण्याचा प्रयत्न केला; परंतु चीनने भारताच्या आजूबाजूच्या देशांवर स्वतःचे नियंत्रण ठेवले आहे. बांगलादेशात लष्कराच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाल्यास चीनशी जवळीक वाढेल, हाही यागील हेतू आहे.
२. ‘जमात-ए-इस्लामी’ची क्रूरता
बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात झालेल्या हिंसाचारामध्ये ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरपंथी संघटनेचा सर्वांत मोठा वाटा होता. याखेरीज अनेक युवकही या हिंसाचारात सामील झाले. ज्यांचे मुख्य काम होते हिंदूंच्या घरातून सामान पळवायचे, त्यांच्या बायकांवर अत्याचार करायचे आणि या हिंसाचारामध्ये स्वतःचा लाभ करून घ्यायचा; मात्र ‘जमात-ए-इस्लामी’चा हिंदू विरोधातील हिंसाचार हा अत्यंत जुना आहे. याचा प्रारंभ होतो वर्ष १९७१ पासून. ज्या वेळेला पाकिस्तानी सैन्याने ‘जमात-ए-इस्लामी’च्या साहाय्याने वर्ष १९७१ च्या युद्धापूर्वी ४० लाख तत्कालीन पूर्व पाकिस्तानी नागरिकांना मारले, ज्यामध्ये ३० लाख हे पूर्व पाकिस्तानमधील हिंदु आणि १० लाख लोक हे ‘अवामी लीग’ या पक्षाचे समर्थक होते.
वर्ष १९७१ नंतर अनेक वेळा बांगलादेशामध्ये वेगवेगळ्या कारणाने हिंसाचार झाला आणि त्यामध्ये सर्वाधिक लक्ष्य केले गेले ते, म्हणजे तिथे असलेल्या हिंदूंना. बांगलादेशामध्ये हिंदूंची संख्या वर्ष १९५० मध्ये २४ टक्के एवढी होती. ती आता वर्ष २०२४ मध्ये न्यून होऊन ८ टक्के एवढी झाली आहे. येणार्या ५ वर्षांमध्ये बांगलादेशी हिंदूंची संख्या ही शून्य टक्क्यांवर येईल. मग हिंदू गेले कुठे ? ते मारले गेले किंवा त्यांनी धर्मपरिवर्तन केले किंवा काही भारतामध्ये पळून आले.
३. ‘जमात-ए-इस्लामी’ची स्थापना आणि तिचा वादग्रस्त इतिहास
‘जमात-ए-इस्लामी’ची स्थापना वर्ष १९४१ मध्ये मौलाना अबुल आला मौदूदी यांनी लाहोर येथे केली होती. संघटनेचे मुख्य ध्येय ‘इस्लामी राज्याची स्थापना करणे’, हे होते. त्यांनी इस्लामी कायद्याच्या आधारे समाज आणि शासन चालवण्याचे विचार मांडले. या संघटनेचा प्रारंभ धार्मिक विचारप्रणाली आणि राजकीय दृष्टीकोन यांच्या आधारावर झाला. या संघटनेचा प्रभाव दक्षिण आशियात विशेषतः पाकिस्तान, भारत अन् बांगलादेश येथे दिसून येतो. या संघटनेचा इतिहास वादग्रस्त असून अनेक विवाद आणि हिंसाचार यांच्या घटनांमध्ये हिचा सहभाग आहे. विशेषतः बांगलादेशातील अशांतता आणि तेथील राजकीय घटनांमध्ये या संघटनेची महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसते. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी ‘जमात-ए-इस्लामी’ने पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. बांगलादेशातील अनेक व्यक्तींनी या संघटनेवर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोपही केले आहेत.
४. ‘जमात-ए-इस्लामी’वर सरकारकडून बंदी
‘जमात-ए-इस्लामी’चे अधःपतन वर्ष २०१० पासून चालू झाले. बांगलादेशातील अशांततेत ‘जमात-ए-इस्लामी’ आणि ‘छात्रशिबिर’ यांचा सहभाग महत्त्वाचा राहिला आहे. विशेषतः वर्ष २०१३ मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये जेव्हा या संघटनेच्या नेत्यांच्या विरोधात युद्धाविषयीचे गुन्हे सिद्ध झाले, त्या वेळी बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. या हिंसाचारात ‘जमात-ए-इस्लामी’च्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे अनेक माध्यमांनी दाखवले आहे.
बांगलादेशातील तत्कालीन शेख हसीना यांच्या सरकारने ‘जमात-ए-इस्लामी’च्या विरोधात कठोर पावले उचलली. हसीना यांच्या सरकारने ‘जमात-ए-इस्लामी’च्या अनेक नेत्यांवर न्यायालयीन कारवाई केली. अनेक नेत्यांना युद्धगुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. वर्ष २०१३ मध्ये बांगलादेशातील न्यायालयाने ‘जमात-ए-इस्लामी’ला राजकीय पक्ष म्हणून बेकायदेशीर ठरवले, ज्यामुळे या संघटनेच्या राजकीय कारवायांवर मर्यादा आल्या. न्यायालयीन निर्णय, नेत्यांची फाशी आणि संघटनेच्या विरोधातील जनआंदोलन यामुळे संघटनेचा प्रभाव न्यून झाला. त्यासह सरकारने या संघटनेच्या विविध शाखांना बंद करण्याचे आदेश दिले.
‘जमात-ए-इस्लामी’च्या हिंसक कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या विचारधारेवर टीका होत आहे. आता गेल्या काही मासांत बांगलादेशामध्ये सरकारविरोधात चालू असलेल्या हिंसक आंदोलनांत ‘जमात-ए-इस्लामी’चा मोठा वाटा होता.
५. येणार्या काळात बांगलादेशामधील हिंदूंचे भवितव्य अतिशय कठीण !
आता येणार्या काळामध्ये आणि बांगलादेशामधील आगामी सरकारमध्ये ‘जमात-ए-इस्लामी’चा राजकीय प्रभाव हा अत्यंत महत्त्वाचा असेल; कारण शेख हसीनांच्या विरोधात असलेली ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ पूर्णपणे ‘जमात-ए-इस्लामी’च्या प्रभावाखाली आहे. यामुळे असे मानले जाते की, येणार्या काळात बांगलादेशामधील हिंदूंचे भवितव्य अतिशय कठीण होणार आहे. भारत सरकारने बांगलादेशामधील परिस्थितीवर लक्ष ठेवून तेथील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करायला पाहिजे अन्यथा आगामी ५ वर्षांमध्ये बांगलादेशी हिंदूंची संख्या ही सध्याच्या ८ टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर येईल.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.