संपादकीय : अमृतातेंही पैजां जिंके ।
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।’ या कवीवर्य सुरेश भट यांच्या पंक्तीतून मराठी भाषिक असल्याचे भाग्य मानणार्या आणि मराठीची महती जाणणार्या मराठीप्रेमींसाठी घटस्थापनेचा सुमंगल दिवस आनंद घेऊन आला. १२ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा प्राप्त झाला. दीड-दोन सहस्र वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याच्या नोंदी आणि प्राचीन साहित्य अन् परंपरा अस्सल असणार्या भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा दिला जातो. तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्ल्याळम् आणि उडिया अशा ६ भाषांनंतर आता मराठी, पाली, प्राकृत, आसामी अन् बंगाली या भाषांना ‘अभिजात’ भाषांचा दर्जा मिळाला आहे.
महाराष्ट्र सरकारने १० जानेवारी २०१२ या दिवशी प्रा. रंगनाथ पाठारे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीने मराठी भाषेवर संशोधन करून तिच्याविषयीचा अभ्यास केला. समितीने मराठी भाषेचे प्राचीनत्व २ सहस्र वर्षांपूर्वीचे असल्याचे सिद्ध करत समृद्ध मराठी साहित्याचाही मागोवा घेतला होता. मराठी भाषेतील शिलालेख, ताम्रपट, ज्ञानेश्वरी, विवेक सिंधु, संतांचे अभंग आणि साहित्य हे मराठी भाषेचे अमूल्य रत्नभंडार असल्याचे समितीने अहवालात नमूद केले. हा अहवाल वर्ष २०१५ मध्ये केंद्रशासनाकडे पाठवला. आता केंद्रशासनाने मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा सन्मान दिल्याबद्दल महाराष्ट्रातील मराठीप्रेमींनी आभार व्यक्त केले आहेत. अभिजात ठरलेल्या मराठीच्या संवर्धनासाठी आता ‘केंद्रपाठबळ’ मिळाले आहे. त्याचा पुरेपूर लाभ आता मराठी भाषेला होणार आहे.
संतपरंपरेप्रती कृतज्ञता !
‘माझा मराठाचि बोलु कौतुकें। परि अमृतातेंही पैजां जिंके ।…’ या ओळींत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ‘अमृतासमवेत पैजही लावली असता अत्यंत गोडवा असलेली माझी मराठी भाषा जिंकेल’, असे सांगून तिचे माधुर्य जगासमोर मांडले आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज यांच्यासारख्या अनेक संतांनी त्यांच्या अभंग-भजनांतून मराठी समृद्ध केली. संत नामदेव महाराज यांनी मराठी बाणा पंजाबपर्यंत पोचवला होता. शिखांच्या ‘गुरुग्रंथसाहिब’मध्ये संत नामदेव यांची ६१ पदे विभूषित आहेत. संत ज्ञानेश्वरांपासून ते शिवकालीन संत जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्वामी, श्रीदासोपंत अशा सगळ्या संतांनी आपली ही मराठी भाषा सुंदर बनवली. भजनदिंड्या आणि कीर्तने यांतून मराठी भाषा अधिक फुलली. अभंग, गवळणी, भारूड-बतावणी आणि ओव्या-उखाणे, झोपाळ्यावर म्हटल्या जाणार्या, माजघरातील, जात्यावरील ओव्या अशा अनेक रचना करून संतांनी मराठीच्या सौंदर्यात भर घातली. मराठीतील संतवाङ्मय एकदा जरी वाचले, तरी मराठीची अद्भुतता लक्षात येऊ शकते. त्यामुळेच ‘मराठी’ भाषा कळसापर्यंत नेणार्या संतांच्या चरणी मराठी जनांनी अनेकदा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
छत्रपती शिवरायांनीही रघुनाथ पंडितांकडून राजभाषा कोश सिद्ध करवून घेतला. स्वातंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेतील साहित्य लिहून तिला टिकवून ठेवले. एवढेच नव्हे, तर त्यांनी भाषाशुद्धीची चळवळ राबवली, जिला लोकमान्य टिळक यांच्यासह अनेक क्रांतीकारकांनी पाठिंबा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजीतील अनेक शब्दांना पर्यायी शब्द निर्माण केले आहेत. त्यातील ‘दिनांक’, ‘क्रमांक, ‘दिग्दर्शक’, ‘कलागृह’, ‘छायाचित्रण’ हे शब्द आज सहज रूळले आहेत.
मराठी भाषा आणि संस्कृती जपा !
‘माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा । हिच्या संगे जागतील, मायदेशातील शिळा ।।’ कुसुमाग्रज यांच्या या ओळी व्यक्तीचा अभिमान जागृत करून कृतीला प्रेरणा देणार्या आहेत. मराठी ही केवळ भाषेपुरती मर्यादित नाही, तर ती एक संस्कृती आहे. मराठी भाषेला असलेली ढब, तिचा सालंकृतपणा, तिची विनम्रता, तिचे माधुर्य या गोष्टी मराठी संस्कृतीच्या दर्शक आहेत. जी भाषा एकाचवेळी ‘मधुरता’ आणि ‘कणखरपणा’ दोन्ही गोष्टी दर्शवते, ती मराठी सहजपणे स्वतःचे अस्तित्व कुणाच्याही मनावर बिंबवते. त्यामुळेच मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती संस्कृती आहे. त्यामुळेच मराठी माणसावर ‘मराठी’ जपण्याचे पूर्णतः नैतिक दायित्व आहे.
मराठीला लाभलेल्या समृद्ध वारशाचे आपण पाईक आहोत, याची जाण ठेवण्याचे मुख्य उत्तरदायित्व आपल्याकडे आहे, हे आजच्या पिढीने लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच भाषेचे संरक्षण, संवर्धन आणि पालकत्व स्वीकारून ती आजच्या युगात रूजवली पाहिजे. मराठी भाषेची दुरवस्था रोखण्यासाठी ती नुसती शिकणे पुरेशी नाही, तर तिच्याविषयी प्रेम आणि आपुलकी वाटायला हवी. मराठी माणसाला मराठी भाषा लिहिता-वाचता आली पाहिजे. मराठीत मोठ्या प्रमाणात साहित्य आहे. त्याचा उपयोग करून आपल्या ज्ञानात भर घालून मराठी भाषा समृद्ध करायला हवी.
‘मराठी व्यावसायिक भाषा नाही’, असे अलीकडच्या युवा पिढीचे मत आहे आणि ‘इंग्रजी ही आर्थिक प्रगतीची भाषा आहे’, असे वाटू लागल्याने आता सर्वच जण मोठ्या प्रमाणात इंग्रजीकडे वळू लागले आहेत. मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत. आहे त्या शाळांमध्ये मराठी शिकवणार्या शिक्षकांची वानवा आहे. ‘मराठी उत्तमरित्या बोलता येत नाही’, हे सांगतांना अनेक लोकांना अजिबात लाज वाटत नाही. उलट ‘इंग्रजी किती चांगली येते’, याचे कौतुक चालू असते; पण मातृभाषेतून शिक्षण घेतलेली व्यक्ती यशाचे शिखर गाठू शकते, याची अनेक उदाहरणे सध्याच्या काळात आहेत.
शहरांप्रमाणे आता गावांमध्येही इंग्रजी किंवा हिंदीमिश्रित मराठीचा वापर सहज होत चालला आहे. त्यामुळे मराठीचे संवर्धन स्वतःपासून चालू करायला हवे. प्रयोगच करायचा झाला, तर एखादे वाक्य इंग्रजी भाषेत म्हणा आणि तेच वाक्य शुद्ध मराठी भाषेत उच्चारून पहा. अंतरात निर्माण होणार्या स्पंदनांवरून भाषांमधील भेद लक्षात येऊ शकतो. मराठी शाळा, मराठी शिक्षण, मराठी शिक्षक आणि मराठी संवर्धन यांसाठी आता जोमाने प्रयत्नांना आरंभ करण्याची हीच वेळ आहे. आपल्या भाषेचा उत्कर्ष आपल्याच हातात आहे, हे लक्षात घ्या !
‘अभिजात भाषा’ म्हणून घोषित झालेल्या मराठीला सुगीचे दिवस आले असल्याने मराठी भाषेच्या संवर्धनाचा पुन्हा आरंभ करूया ! |