सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मोक्षदायी देवता साधिकेच्या जीवनात येणे

१. मुक्तेश्वरी देवीचे दर्शन घेतांना भाव जागृत होणे

‘मी मार्च २०२४ मध्ये कोल्हापूर येथे होते. तेथे असतांना मी प्रतिदिन माझ्या आईसह (श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७४ वर्षे) श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात दर्शनासाठी जायचे. श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या आवारात असलेल्या श्री शाकंभरीदेवीच्या (आमच्या कुलदेवीच्या) दर्शनाला जायचो. एक दिवस श्री शाकंभरीदेवीच्या मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर काही पायर्‍या चढून गेल्यावर एका नवीन मंदिराकडे माझे लक्ष गेले. त्या मंदिरावर ‘मुक्तेश्वरीदेवी’ अशी पाटी होती. मी आकर्षित झाल्याप्रमाणे त्या देवीसमोर जाऊन उभी राहिले. देवीचे रूप अत्यंत सुंदर होते. मी तिच्याकडे पहातच राहिले. देवीचे दर्शन घेतांना माझा भाव जागृत झाला. त्या मूर्तीच्या समोर महादेवाची एक पिंड होती. मी अगदी बालपणापासून नियमित श्री महालक्ष्मी मंदिरात जाते, तरीही मला तेथे मुक्तेश्वरीदेवीचे मंदिर असल्याचे ठाऊक नव्हते.

अश्‍विनी अनंत कुलकर्णी

१ अ. देवी स्वत:च जीवनात आल्याचे साधिकेला जाणवणे : मुक्तेश्वरीदेवीचे दर्शन घेतल्यानंतर मी आमच्या एका नातेवाइकांना या मंदिराविषयी विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मुक्तेश्वरीदेवीचे मंदिर आधी मणिकर्णिका कुंडाच्या बाजूला होते. आता ती देवीची मूर्ती या नवीन मंदिरात स्थापन केली आहे.’’ त्या वेळी ‘देवी स्वत:च माझ्या जीवनात आली’, याची मला जाणीव होऊन तिच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. त्यानंतर गोव्याला येईपर्यंत प्रतिदिन मला देवीच्या कृपेने तिचे दर्शन मिळाले.

२. तारकेश्वर महादेवाच्या दर्शनाने मन शांत आणि निर्विचार होणे

महाशिवरात्रीला देवाने मला आणखी एक अनुभूती दिली. आमच्या एका परिचितांनी आम्हाला महादेवाच्या एका मंदिरात महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी येण्यास संगितले. ते तेथील पूजक (पुजारी) होते. पंचगंगा नदीच्या तिरावरील त्या मंदिराविषयी मला काहीच माहिती नव्हती. महाशिवरात्रीच्या दिवशी आई आणि मी त्या मंदिरात गेलो. महादेवाचे दर्शन घेतांना माझे मन एकदम शांत आणि निर्विचार झाले. आमच्या परिचितांनी त्या मंदिराविषयी सांगितले, ‘‘हे तारकेश्वर महादेवाचे मंदिर प्राचीन, म्हणजे ११ व्या शतकातील आहे. ‘तारकेश्वर महादेव ‘मोक्षदायी’ (मोक्ष देणारा) आहे’, असे मानले जाते.’’ ते ऐकून माझे मन अत्यंत आनंदित झाले. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेनेच जीवनाच्या या टप्प्यावर या २ मोक्षदायी देवता माझ्या जीवनात आल्या’, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

३. साधना चांगली असल्यामुळे अनुभूती आल्याचे संतांनी सांगणे

पुढे मी एका संतांना विचारले, ‘‘ज्याप्रमाणे योग्य वेळी गुरु आपल्या जीवनात येतात, तशाच देवताही येतात का ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘तुमची साधना चांगली असल्यामुळे तुम्हाला या अनुभूती आल्या. देवतांची नावेही किती छान आहेत, ‘मुक्तेश्वरी आणि तारकेश्वर !’’

‘श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवा, आपल्या कृपेनेच आम्हाला या देवतांच्या दर्शनाचे भाग्य लाभले. यासाठी मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– अश्विनी अनंत कुलकर्णी, ढवळी, फोंडा, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक