श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांना स्वप्नात जाणवलेली महानता !
‘३.७.२०२४ या दिवशी रात्री मला स्वप्नात दिसलेल्या दृश्याविषयी येथे दिले आहे.
१. मला स्वप्नात दिसले, ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दूर एका डोंगरावरील कुटीत वास्तव्य आहे. त्यांची कुटी आणि अंगणाचा परिसर पुष्कळ दैदीप्यमान आहे.
२. पृथ्वीवर आपत्काळ चालू आहे आणि अनेक वाईट शक्ती आक्रमण करत आहेत. सगळीकडे हाहा:कार माजला आहे. त्याचे निवारण होण्यासाठी आम्ही (मी आणि काही साधक) श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना शरण गेलो आहोत.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कुटीभोवतीचा परिसर एवढा चैतन्यमय होता की, आम्हाला तेथे प्रवेशही करता येत नव्हता. आम्ही त्यांना शरण गेल्यावर त्या कुटीच्या बाहेर आल्या.
४. त्यांनी पिवळ्या रंगाची लाल काठ असलेली साडी परिधान केली होती. त्यांनी विविध तेजस्वी अलंकार धारण केले होते. त्यांच्या सभोवती पुष्कळ तेज झळकत होते. त्यांनी डोळे उघडले आणि सर्वत्र पाहून आमच्या रक्षणाचा संकल्प केला.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी केवळ आमच्याकडे पाहिले आणि आमच्याभोवती कवच निर्माण झाले. त्यामुळे आमच्यावर वाईट शक्ती आक्रमण करू शकत नव्हत्या. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी चहुबाजूने दृष्टी फिरवल्यावर वाईट शक्ती दूर पळाल्या आणि पृथ्वीचे रक्षण झाले.’
– पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार (सनातनच्या ६९ व्या संत, वय ३४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.७.२०२४)
|