रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रीच्या निमित्ताने होणार्‍या ‘देवी होमा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘२६.९.२०२२ या दिवशी रामनाथी गोवा, येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रीच्या निमित्ताने ‘देवी होम’ केला. त्या वेळी साधकांना ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ।’हा मंत्र म्हणायला सांगितला होता.

कु. प्रतीक्षा हडकर

१.  ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ।’ हा मंत्र म्हणत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती 

अ. ‘देवी यागा’च्या वेळी ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ।’ हा मंत्र म्हणत असतांना मला निर्विचार स्थिती अनुभवता आली.

आ. मंत्र म्हणत असतांना ‘मी एका विशाल पोकळीत खोल खोल जात आहे’, असे मला वाटत होते. ‘श्री भगवतीदेवी आपल्याला एका विशाल पोकळीत घेऊन जात आहे’, असे मला जाणवत होते. त्या पोकळीत शंखामधून ‘ॐ’ चा नाद येतो, तसा आवाज घुमत होता.

इ. ‘मंत्रातील स्वर ब्रह्मांडात (वरच्या पोकळीत) जात आहेत’, असे मला जाणवले. नंतर मला हलकेपणा जाणवत होता.

ई. ‘वार्‍याच्या लहरी लोहचुंबकाप्रमाणे मला आत आत ओढत आहेत’, असे मला जाणवले.

उ. ‘मी दैवीलोकात आहे’, असे मला जाणवत होते. या दैवीलोकात पांढरा शुभ्र धूर होता. ‘या धुरात जाऊन लपून रहावे आणि येथेच साधना करावी’, असे मला वाटत होते. मला मध्येमध्ये धुपाचा सुगंध येत होता. ‘यातून बाहेर येऊच नये’, असे मला वाटत होते.

२. ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ।’ हा मंत्र पुरोहित साधकांनी सांगितल्यावर सर्व जण पुन्हा म्हणत असतांना मला शक्ती जाणवत होती.

३. आज्ञाचक्रावर संवेदना जाणवणे आणि आज्ञाचक्राच्या जवळील भाग पाठी-पुढे हलत असल्याचे अनुभवण्यास मिळणे

‘हे श्री सरस्वतीमाते, माझे हृदय आणि कंठ यांमध्ये तूच आहेस. हे मंत्र तूच माझ्या मुखातून म्हणणार आहेस’, अशी मी प्रार्थना केली. तेव्हा मंत्र म्हणत असतांना ‘मला अनाहतचक्राच्या ठिकाणी कमळाचा आकार आहे’, असे जाणवले आणि ‘कमळाच्या एक एक करून सर्व पाकळ्या उघडत आहेत’, असेही मला जाणवले.’

‘मी म्हणत असलेला मंत्र माझ्या आज्ञाचक्राजवळ असलेल्या कमळामध्ये जात आहे’, असे मला जाणवले. त्याच वेळी मला आज्ञाचक्रावर संवेदना जाणवत होत्या. आज्ञाचक्राच्या जवळील भाग वर-खाली हलत असल्याचे मला जाणवले.’

– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.९.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक