‘श्री महालक्ष्मीदेवीचा विजय असो’च्या गजरात भावपूर्ण वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ !
कोल्हापूर – ‘श्री महालक्ष्मीदेवीचा विजय असो’, ‘आई अंबाबाईचा उदो उदो’,च्या गजरात मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झाला. ३ ऑक्टोबरला सकाळी ७.३० वाजता श्रीपूजक दांपत्य शेखर मुनीश्वर यांच्या हस्ते पुण्याहवाचन करून श्री महालक्ष्मीदेवीची घटस्थापना करण्यात आली. सकाळी साडेआठ ते साडेअकरा या वेळेत धार्मिक विधी झाल्यावर दुपारी २ वाजता श्री महालक्ष्मीदेवीची ‘सिंहासनारूढ’ अलंकारिक पूजा बांधण्यात आली.
संपूर्ण श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात अत्यंत सुंदर आणि आकर्षक अशी झेंडूच्या फुलांची आरास करण्यात आलेली आहे. गरुड मंडप परिसर आणि जागोजागी खांबांवर झेंडूच्या फुलाचे ‘ॐ’ काढण्यात आले आहेत. यासमवेत मंदिर परिसरात केळीचे घड-केळीचे खुंट, तसेच झेंडूच्या माळांची आरास करण्यात आली आहे. येणार्या भाविकांना ऊन लागू नये, तसेच पावसापासून त्यांचे संरक्षण होण्यासाठी मंदिराच्या आवारात, तसेच दर्शन रांग जेथपर्यंत आहे, तेथपर्यंत संपूर्ण मंडप टाकण्यात आला असून त्यावर पत्रे टाकण्यात आले आहेत. आज पहाटे ५ वाजल्यापासूनच मंदिर परिसर भाविक-भक्तांनी फुलून गेला होता.
१. भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिराचे स्वतःचे ९६ सीसीटीव्ही असून आणखी २० अधिक सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. याचसमवेत मंदिराची स्वतंत्र वॉकीटॉकी यंत्रणा असून विशेष ड्रोनद्वारेही लक्ष ठेवण्यात येणार आहे.
२. मंदिर परिसरात ५ ठिकाणी भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. दर्शन रांगेतही पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
३. भाविकांना देण्यात येणारा लाडू प्रसाद वितरण करण्यासाठी ४ कक्ष उघडण्यात आले आहेत. गतवर्षी १३ लाख भाविकांनी दर्शन घेतले होते. त्याचा अंदाज घेऊन यंदा १ लाख ८० सहस्र बुंदीच्या लाडूंची ‘ऑर्डर’ देण्यात आली आहे. सध्या हा प्रसाद कळंबा कारागृहातील बंदीवानांकडून सिद्ध करण्यात येतो. तिरुपति बालाजी देवस्थान येथील प्रसादामध्ये भेसळीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या लाडू प्रसादाचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडून घेतले जाणार आहेत.
४. मंदिराच्या बाहेर विद्यापीठ हायस्कूलच्या समोर पोलीस नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात २०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मंदिरात येणार्या भाविकांना ‘व्हाईट आर्मी’च्या वतीनेही आपत्कालीन सुविधा देण्यात येणार आहेत.