पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची ‘श्री’ म्हणजेच महालक्ष्मी स्वरूपात पूजा !

श्री महालक्ष्मीदेवीची ‘श्री’ म्हणजेच महालक्ष्मीस्वरूपातील बांधण्यात आलेली पूजा

कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची पहिल्या दिवशी (आश्विन शुक्ल प्रतिपदा) श्रीसूक्तामध्ये वर्णन केलेल्या ‘श्री’ अर्थात् महालक्ष्मी स्वरूपात बैठीपूजा बांधण्यात आली होती. श्री सूक्तातील श्री महालक्ष्मी ही आदिजननी आहे. तिने आपल्या तपोबळावर बिल्ववृक्ष निर्माण केला. ज्याची फळे तिला प्रिय आहेत. तिने सृष्टी निर्माण केली. तिने सर्वांना धन, धान्य, पशू, पुत्र, कन्या, भरपूर प्रमाणात पाणी, शेणखत, फळे, फुले, निर्मितीची, सृजनाची, क्षमता असे सर्वकाही दिले. श्रीसूक्तामधील श्री महालक्ष्मी ही हत्ती, घोडे, गायी यांसारख्या पशूंच्या सानिध्याने प्रफुल्लित होते. तिचे आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लित असे पुत्रवत् ऋषी सदैव तिच्या सेवेत असतात.