‘टेलिग्राम ॲप’द्वारे येणार्या संदेशांच्या संदर्भात सतर्कता बाळगा !
साधकांसाठी सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !
सध्या ‘ऑनलाईन’ वा भ्रमणभाषद्वारे होणार्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याविषयी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमधून वेळोवेळी सूचना देण्यात येते. यामध्ये व्हॉट्सॲप प्रमाणे ‘टेलिग्राम ॲप’चाही अनेकांकडून वापर होतो. या ॲपद्वारेही फसवणुकीचे प्रकार होत आहेत. या ॲपवरून आपल्याला एखाद्या परिचयाच्या किंवा अनोळखी व्यक्तीच्या नावाने खोट्या लघुसंदेशाद्वारे (मेसेजद्वारे) पैशांच्या व्यवहारासंदर्भात काही लिंक पाठवण्यात येतात. या लिंक उघडल्यास (ओपन केल्यास) त्याद्वारे आपली आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. यासाठी अशा लिंक आल्यास सर्वांनी सावधगिरी बाळगावी आणि त्या लिंक ओपन करू नयेत.
‘टेलिग्राम’वर एखादा व्यक्तीचा क्रमांक ‘सेव्ह’ (संरक्षित) नसतांनाही त्याच्या नावे संदेश आल्यास पुढील गोष्टी लक्षात घ्या !
‘टेलिग्राम’वर एखादा संदेश आल्यावर, जर आपल्या भ्रमणभाषमध्ये तो क्रमांक सेव्ह (संरक्षित) केलेला नसेल, तर एखाद्या व्यक्तीच्या नावे तो संदेश दिसतो. असे नाव आपल्या परिचयाचे असल्यास यामुळे आपली फसवणूक किंवा दिशाभूल होण्याची शक्यता असते. त्यामुळे साधक, वाचक, हितचिंतक अथवा धर्मप्रेमी यांना ‘टेलिग्राम’वर कुणाच्याही नावे कोणतीही ‘लिंक’ आल्यास त्यांनी त्याची खात्री केल्याविना लिंक उघडू नयेत, तसेच कुणालाही अनावश्यक ‘रिप्लाय’ (प्रतिसाद) देऊ नये. कुणाकडून अशी लिंक आल्यास किंवा फसवणुकीचा प्रकार होत असल्यास आपल्या उत्तरदायी साधकांना कळवावे.