प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात ख्रिस्त्यांच्या पोलीस ठाण्यांत तक्रारी
गोव्यातील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याची मागणी केल्याचे प्रकरण
(‘डी.एन्.ए.’ म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक)
पणजी, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याची मागणी हिंदू रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती. फ्रान्सिस झेवियर यांचा अवमान करणारे विधान केल्याच्या प्रकरणी कोकणी लेखक मायकल ग्रासीयस आणि इतर एकूण २० जणांनी जुने गोवे पोलीस ठाण्यात, तर माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव आणि त्यांची कन्या वालांका आलेमाव यांनी कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचे हळदोणाचे आमदार कार्लुस फरेरा आणि भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनीही प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्यावर टीका केली आहे.
जुने गोवे येथे तक्रार करण्यात आलेल्या २० जणांच्या गटात माजी आमदार ॲलिना साल्ढाणा यांचाही सहभाग होता. या तक्रारीत म्हटले आहे, ‘प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी हल्लीच्या काळात फ्रान्सिस झेवियर आणि चर्च यांच्या विरोधात सातत्याने अवमानकारक विधाने केली आहेत. यामुळे ख्रिस्ती समुदायाच्या विरोधात द्वेष पसरवला जात असून ख्रिस्त्यांच्या भावनाही दुखावल्या आहेत.’ प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि हळदोणाचे आमदार कार्लुस फरेरा यांनी ‘भाजप बेरोजगारी, भू रूपांतर आदी ज्वलंत प्रश्नांवरून लोकांचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी काही लोकांचा वापर करून राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवत आहे’, असा आरोप केला आहे.
पंतप्रधानांनी विधानाची नोंद घ्यावी ! – वॉरेन आलेमाव यांचे पंतप्रधानांना पत्र
प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याची केलेली मागणी चुकीची आहे. यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्याने याविषयी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी वॉरेन आलेमाव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे एक पत्राद्वारे केली आहे.
आलेमाव यांचा ‘डी.एन्.ए.’ संपूर्ण गोव्याला माहिती आहे ! – भाजप
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात तक्रार करणारे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव या दोघांचा ‘डी.एन्.ए.’ एकच आहे. आलेमाव कुटुंबियांचा ‘डी.एन्.ए.’ संपूर्ण गोमंतकाला माहिती आहे. काँग्रेस पक्ष हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर का टीका करत आहे, याचे कारण समजत नाही’, असे मत भाजपचे प्रवक्ते गिरीराज वेर्णेकर यांनी पणजी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केले.