संपादकीय : ‘स्वच्छ भारत’ची दशकपूर्ती !
स्वच्छ भारत अभियानाला २ ऑक्टोबर या दिवशी १० वर्षे पूर्ण झाली. वर्ष २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर प्रथमच गांधी जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेस प्रारंभ केला होता. आता दशकपूर्तीनिमित्त नरेंद्र मोदी यांनी देहली येथील एका शाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांसमवेत स्वच्छता केली. सर्वांना या अभियानात सहभागी होण्यास सांगितले. प्रत्येक वर्षी या अभियानाच्या अंतर्गत वेगवेगळी धोरणे ठरवली जातात. यंदा ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ असे धोरण ठरवण्यात आले आहे. या मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारत देश आणि स्वच्छता या दृष्टीने विचारमंथन होणे आवश्यक आहे.
स्वच्छतेचा वसा हाती घेणारे पहिले नेतृत्व !
विश्वातील अन्य राष्ट्रे आणि भारत यांच्यात स्वच्छतेच्या दृष्टीने नेहमीच तुलना केली जात होती, केली जाते आणि भविष्यातही केली जाईल, यात शंका नाही; पण पूर्वी ही तुलना भारतासाठी द्वेषकारक, अपमानास्पद आणि न्यून लेखणारी होती. ‘भारत म्हणजे गचाळ आणि अस्वच्छ देश’ अशा स्वरूपात भारताला हिणवले जात असे; पण पंतप्रधान मोदी यांनी या मोहिमेच्या माध्यमातून पायंडा घातला. स्वतः हातात झाडू घेऊन देशासमोर स्वच्छतेसाठीचा आदर्श निर्माण केला. त्यामुळे ‘भारतात आता स्वच्छतेच्या दृष्टीने काही अंशी तरी जागृती होत आहे’, असे म्हणता येईल. नागरिकही सतर्कतेने काही प्रमाणात कृती करत आहेत. स्वच्छतेसाठी गेली १० वर्षे सातत्याने जनतेचे प्रबोधन करणे, हे केवळ पंतप्रधान मोदी यांनाच जमले. असे करणारे ते भारतातील एकमेव आणि पहिलेच नेतृत्व म्हणावे लागेल. त्यामुळे त्यांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच ! देशाच्या प्रगतीचे अत्युच्च शिखर गाठण्यासाठी पाया बळकट असावा लागतो. ‘त्याचा प्रारंभ स्वच्छतेपासून होतो’, हे मोदी यांनी सर्वार्थाने जाणले आणि सर्वच भारतियांना आवाहन करत त्यासाठी कृतीशील केले. त्यांनी स्वच्छतेचा भक्कम पाया घातल्यामुळे भविष्यात सुरक्षित आणि सुंदर भारताची निर्मिती होणार आहे, हे निश्चित !
स्वच्छ भारत मोहिमेच्या अंतर्गत भारतात असंख्य पालट झाले. स्वच्छतेच्या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा ठिकठिकाणी घेण्यात आल्या. प्रत्येक प्रभागासाठी घंटागाडी नेमण्यात आली. इतकेच नव्हे, गाडी येत असल्याचे कळण्यासाठी त्यावर गाणी वाजवण्यात येऊ लागली. त्यातही प्रदेश किंवा भाषा यांनुसार विविधता आणण्यात आली. त्यातील एक गाणे आहे, ‘स्वच्छ भारत का इरादा ।’ यामध्ये ‘स्वच्छता की ज्योत लेकर घर-घर जायेंगे, साफ सुधरी रोशनी में सब नहायेंगे ।’, अशी एक ओळ आहे. ‘स्वच्छतेमुळे सर्वत्र प्रकाश पसरतो, नवचैतन्य निर्माण होते’, असा आशय घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. ही निश्चितच अभिनव पद्धत आहे. अशा प्रकारे अनेक स्तरांवर नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. सर्वांकडून स्वच्छतेचे धडे गिरवण्यात येत आहेत. लहान मुलांनाही स्वच्छता राखण्यास उद्युक्त केले जात आहे. आता प्रत्येक नागरिकाचे तितकेच कर्तव्य आहे की, मोदींनी आरंभलेली ही स्वच्छतेची धुरा आपण पुढे न्यायला हवी. स्वच्छतेचा वसा घ्यायला हवा. प्रत्येक जण स्वच्छतादूत झाला, तर देशाला प्रगतीपथावर नेण्यास वेळ लागणार नाही. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, हा सुविचार नेहमीच लक्षात ठेवायला हवा.
स्वच्छ आणि सुंदर भारत घडवण्यासाठी राष्ट्रभक्तीचा उद्घोष करणे अपेक्षित आहे; पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतियांमध्ये राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्रभक्ती नावालाही नाही. मग तो उद्घोष होणार कुठून ? जे भारतीय विदेशात कामासाठी किंवा पर्यटनासाठी जातात, ते तेथील स्वच्छतेचे गोडवे गातात आणि भारताला न्यून लेखतात; पण या स्वच्छतेमागील गमक त्यांच्या लक्षात येत नाही. ‘आपणही भारतातील स्थितीला तितकेच उत्तरदायी आहोत’, अशा दृष्टीने ते विचार करत नाहीत. याउलट विदेशी लोकांमध्ये आपापल्या राष्ट्राप्रती प्रेम आणि अभिमान असतो. त्याच्या बळावर ते सर्व ठिकाणी स्वच्छतेचे पालन करतात. कुणी तसे करत नसल्यास त्यांना शिक्षा करण्याचीही तेथे पद्धत अस्तित्वात असते. शिक्षेचे पालन संबंधितांकडून निमूटपणे केले जाते. याला म्हणतात, ‘कायदा-सुव्यवस्था !’ भारतात कायदा-सुव्यवस्था यांचीच ऐशीतैशी उडाली आहे. त्यामुळे मग तेथे स्वच्छता कशी टिकणार ? बरे शिक्षा करायची म्हटली, तरी देशाविषयी कसलेच देणे-घेणे नसल्याने ती शिक्षाही लाथाडली जाऊ शकते. असे होऊ नये; म्हणून सर्वांमध्ये देशप्रेम निर्माण करायला हवे. स्वच्छतेसाठी प्रयत्न करतांना सरकारने याकडेही लक्ष देणे अत्यावश्यक आहे. आपल्याकडे स्वच्छता करणारे अल्प आणि कचरा करणार्यांचीच संख्या मात्र अधिक आहे. हे लाजिरवाणे आहे. मोदींनी चालू केलेल्या मोहिमेला यशोशिखरावर नेण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे. काही ठिकाणी अभियानाला यश मिळत असले, तरी काही ठिकाणी अद्याप स्वच्छतेची दैनाच झालेली आहे. ही स्थिती सुधारावी लागेल. त्यासाठी नागरिकांची मानसिकता पालटणे आवश्यक आहे. विदेशात ज्याप्रमाणे अस्वच्छता करणार्यांना शिक्षा केली जाते, त्याप्रमाणे भारतातही कठोर शिक्षेची कार्यवाही करण्यात आली पाहिजे. शिक्षेचा धाक असेल, तरच व्यक्ती योग्य कृती करण्यास उद्युक्त होते. शिक्षा वचक निर्माण करते. शिक्षेमुळेच मानसिकता पालटता येऊ शकते. राष्ट्र स्वच्छ हवे असेल, तर विचारही स्वच्छ हवेत. सध्या अनेकांमध्ये असलेली राष्ट्रद्वेषी मानसिकता, भ्रष्टाचारी मनोवृत्ती, वाढती वासनांधता, लोभी वृत्ती, अन्याय, अत्याचार करण्याची प्रवृत्ती हा कचराही वेळोवेळी स्वच्छ करायला हवा. केवळ स्थुलातील कचर्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. अप्रत्यक्ष; पण देशाच्या प्रगतीसाठी हानीकारक ठरणारा कचराही हद्दपार करावाच लागेल.
भारताला लुटणारी काँग्रेस !
आजवर तत्कालीन काँग्रेस सरकारला जे जमले नाही, ते पंतप्रधान मोदी यांनी करून दाखवले. काँग्रेसला कोणतीही पायाभरणी करणे कधी जमलेच नाही. काँग्रेसने केली, ती केवळ आणि केवळ देशाची लूटच ! स्वतःचे खिसे कसे भरता येतील आणि आपल्याला पैशांच्या राशीत कसे लोळता येईल, मनमुरादपणे सत्तासुख कसे घेता येईल, इतकेच काँग्रेसने पाहिले आणि भारताला लुबाडण्याचे चक्र चालूच ठेवले. त्यामुळे देश अस्वच्छ, बरबटलेला आणि प्रगतीहीन राहिला. भारतातील राजकारणातही स्वच्छता मोहीम राबवणे आवश्यक आहे, हे यातून लक्षात येते. आता ‘स्वच्छ भारत’च्या दशकपूर्तीनिमित्त प्रत्येक नागरिकाने संकल्प करायला हवा. हे अभियान केवळ एक दिवस नव्हे, तर अखंडपणे चालू ठेवून त्याची यथोचित फलनिष्पत्ती मिळवून देणे, हे भारतियांचे कर्तव्य आहे.
भारतात राष्ट्राप्रती अयोग्य मानसिकता असणार्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी कठोर शिक्षेचे प्रावधान आवश्यक ! |