चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक, महाराजांकडून अटकेच्या वृत्तास नकार !
पिंपरी -चिंचवड (जिल्हा पुणे) – प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य वाडेकर (महाराज) यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २ ऑक्टोबरला मध्यरात्री अटक केली आहे. चैतन्य महाराजांनी त्यांचे इतर २ भाऊ आणि नातेवाइक यांसह घराच्या जवळून जाणारा रस्ता पोकलेनने अवैधपणे खोदल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी ह.भ.प. चैतन्य महाराजांसह अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आस्थापनाचे व्यवस्थापक अजित पाटील यांनी म्हाळुंगे पोलिसांत तक्रार दिली होती. अटकेच्या कारवाईविषयी विचारले असता चैतन्य महाराज यांनी सांगितले की, पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; म्हणून आम्हाला कह्यात घेतले आणि सोडून दिले. त्यांच्या घराच्या शेजारी असलेल्या आस्थापनाच्या रस्त्यावरून त्यांच्यात वाद आहेत. त्यातून त्यांनी रात्री त्यांच्या २ भावांसह रस्ता अवैधरित्या खोदला. चैतन्य महाराज वाडेकर यांनी मात्र त्यांना अटक झाली नसल्याचे म्हटले आहे.