श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी भगवान श्रीनरसिंह आणि श्रीकृष्ण अन् गोपी यांच्या संदर्भात सांगितलेली भावसूत्रे !

‘७.७.२०२४ या दिवशी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आमच्या घरी आल्या होत्या. त्या वेळी मी काढलेली प्रल्हादाच्या चरित्राविषयीची चित्रे त्यांना दाखवली. ती चित्रे पहात असतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मला उत्स्फूर्तपणे काही अद्भुत सूत्रे सांगितली. ती ऐकतांना माझी पुष्कळ भावजागृती झाली. ती सूत्रे पुढे दिली आहेत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. भगवान श्रीनरसिंहाच्या संदर्भातील सूत्रे

१ अ. अहोबिला क्षेत्रातील भगवान श्रीनरसिंहाच्या मंदिराकडे जंगलातून जातांना सिंहाचा गंध येणे आणि तेथे श्रीनरसिंहाचे अस्तित्व असल्याचे जाणवून अंगावर रोमांच येणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ आंध्रप्रदेशमधील अहोबिला क्षेत्रातील भगवान श्रीनरसिंहाचे दर्शन घेण्यासाठी जंगलातून जात होत्या. त्या वेळी त्यांना सिंहाचा गंध आला. त्या लहान असतांना सांगलीतील एका जमीनदाराने सिंह पाळले होते. ते सिंह पहाण्यासाठी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ जात होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना सिंहाचा गंध परिचित आहे. त्यांना सिंहाचा गंध जाणवल्यामुळे ‘अहोबिला क्षेत्रात प्रत्यक्ष भगवान श्रीनरसिंहाचे अस्तित्व आहे’, याची त्यांना अनुभूती आली. त्या वेळी त्यांच्या अंगावर रोमांच आले.

पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

१ आ. हिरण्यकश्यपूच्या वधानंतर नरसिंहाने प्रल्हादाचा राज्याभिषेक करणे आणि योगनरसिंहाचे रूप घेऊन प्रल्हादाला राजधर्माचे ज्ञान देणे : अहोबिला क्षेत्रातील नरसिंहाच्या ९ मूर्तींपैकी एक मूर्ती योगनरसिंहाची आहे. हिरण्यकश्यपूचा वध करणार्‍या उग्रनरसिंह स्वामींना आपण सर्व जण जाणतो. योगमुद्रेतील या नरसिंहाच्या मूर्तीचे रहस्य काय आहे ? हिरण्यकश्यपूच्या वधानंतर भगवान नरसिंहाने प्रल्हादाचा राज्याभिषेक केला. त्या वेळी त्याने योगनरसिंहाच्या रूपात प्रल्हादाला राजधर्माचे ज्ञान दिले. त्या ज्ञानामुळेच प्रल्हाद पुढील सहस्रो वर्षे कुशलतेने आणि न्यायीपणाने राज्य करू शकला.

२. श्रीकृष्ण आणि गोपी यांच्या संदर्भातील सूत्रे

२ अ. गोपींची श्रीकृष्णाप्रती असलेली पराकोटीची भक्ती दर्शवणारा एक प्रसंग ! : गोपी श्रीकृष्णाला सांगत असत, ‘‘क्षणभरही तुझे दर्शन मिळाले नाही, तर आम्ही त्वरित प्राणत्याग करू.’’ ‘गोपींच्या बोलण्यात किती सत्यता आहे ?’, ते पहाण्यासाठी श्रीकृष्ण उत्सुक असतो. त्यामुळे एकदा गोपींच्या समवेत रासलीला करत असतांना भगवान श्रीकृष्ण अकस्मात् अदृश्य होतो; परंतु तो अदृश्य झाल्यानंतरही गोपींचे गाणे, नृत्य करणे आणि श्रीकृष्णाच्या लीला साकारणे चालूच रहाते. ते पाहून श्रीकृष्ण गोपींसमोर प्रगट होतो. मुखमंडलावर खोडकर हसू आणत तो गोपींना विचारतो, ‘‘तुम्ही मला जे सांगत होता, ते खोटे आहे. मी अदृश्य झाल्यावर तुमच्यापैकी कोणीही प्राणत्याग केला नाही. उलट ‘तुम्ही गाणे गात आणि नाचत आनंद साजरा करत आहात’, असे मला दिसले.’’

तेव्हा गोपींनी जे उत्तर दिले, ते ध्रुवतार्‍याप्रमाणे कृष्णाप्रती असलेली त्यांची परकोटीची भक्ती प्रगट करते. त्या एकसुरात म्हणाल्या, ‘‘कृष्णा, तू आमच्या हृदयसिंहासनावर आमच्या प्राणाच्या रूपात विराजमान आहेस. त्यामुळे जेव्हा यमधर्म आमचे प्राण हरण करायला येतो, तेव्हा तो आमच्या जवळ यायलाही घाबरतो; कारण तो प्राणाच्या रूपात विराजमान असलेल्या तुला पहातो. तुझे अस्तित्व नसलेले प्राण आम्ही ठेवू शकत नाही आणि तुझ्या अस्तित्वामुळे आम्ही प्राण सोडूही शकत नाही. त्यामुळे खरा अपराधी तूच आहेस कृष्णा !’’ गोपींच्या या उत्तराने भगवान श्रीकृष्ण निःशब्द होतो.

२ आ. श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी आतुरलेल्या गोपीने दिलेले भक्तीने ओथंबलेले उत्तर ! : श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी एक गोपी प्रतिदिन आतुरतेने वाट पहात असे. प्रतिदिनचे हे प्रकार पाहून एकदा तिची सासू तिला कडक शब्दांत सांगते, ‘‘तू प्रतिदिन श्रीकृष्णाची वाट पहाण्यात वेळ वाया घालवू शकत नाहीस. तू असे करत असल्यामुळे घरची सर्व कामे खोळंबून रहातात.’’ तेव्हा त्या गोपीने दिलेले उत्तर, म्हणजे भक्तीने ओथंबलेले काव्य असून ते काव्य सोनेरी अक्षरांत कोरण्यासारखे आहे. गोपी म्हणते, ‘‘आई, मला एक दिवस जरी श्रीकृष्णाचे दर्शन झाले नाही, तरी माझा जीव जाईल. तेव्हा त्याचा शोध इतरत्र कुठेही घेऊ नका; कारण तो श्रीकृष्णाच्या गळ्यातील वैजयंती माळेच्या भोवती गुंजारव करणारी आणि श्रीकृष्णाच्या चालण्याच्या तालाच्या समवेत आनंदाने डोलणारी मधमाशी बनलेला असेल.’’

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन् (सनातनच्या ७० व्या संत, वय ५८ वर्षे), चेन्नई, तमिळनाडू. (७.७.२०२४)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक