नवरात्र व्रताचे प्रकार, त्याची अंगे आणि अन्य शास्त्रीय माहिती

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून चालू होणार्‍या नवरात्रकाळात शरद ऋतु असल्याने या नवरात्रास ‘शारदीय नवरात्र’, असेही म्हणतात. या लेखाच्या माध्यमातून नवरात्र व्रताचे प्रकार, नवरात्रात ‘सप्तशती पाठा’चे महत्त्व आणि नवरात्र काळातील महत्त्वाच्या तिथींचे महत्त्व येथे देत आहोत. ३ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘नवरात्र व्रताचे प्रकार, कुमारिका पूजन आणि नवरात्रात ‘सप्तशती पाठा’चे महत्त्व’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा आधीच भाग वाचण्याकरीत येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/840160.html

श्री दुर्गा देवी

६. आश्विन मासातील तिथींचे महत्त्व 

अ. शुद्ध प्रतिपदा : घटस्थापना

आ. पंचमी : ललितापंचमी

इ. षष्ठी  : सरस्वती आवाहन (मूळ नक्षत्र)

ई. सप्तमी : महालक्ष्मीपूजन आणि घागर फुंकणे

उ. अष्टमी : दुर्गाष्टमी

ऊ. नवमी : नवरात्र उत्थापन आणि गायत्रीदेवीचा उत्सव.

ए. दशमी : विजयादशमी आणि नवरात्र समाप्ती

ऐ. एकादशी : पाशांकुशा एकादशी

ओ.  पौर्णिमा : कोजागरी आणि वाल्मीकि जयंती.

औ. कृष्ण पक्ष चतुर्थी : संकष्टी चतुर्थी

क. कृष्ण पक्ष अष्टमी : कालाष्टमी

ख. कृष्ण पक्ष एकादशी : रमा एकादशी

ग. कृष्ण पक्ष द्वादशी : वसुबारस

घ. कृष्ण पक्ष त्रयोदशी : धनत्रयोदशी

च. कृष्ण पक्ष चतुर्दशी : नरक चतुर्दशी

झ. अमावस्या : दीपावली लक्ष्मीपूजन आणि विक्रम संवत् समाप्ती.

७. विजयादशमी

विजयादशमीच्या दिवशी प्रभु रामचंद्रांनी रावणाचा वध केला. वाईट प्रवृत्तीवर सत्प्रवृत्ती विजय मिळवतेच, ही गोष्ट अधोरेखित करणारा हा दिवस ! विजयादशमी साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त. आपल्या पराक्रमी पूर्वजांनी या दिवशी घराबाहेर पडून विजयश्री खेचून आणली, असा हा आनंदाचा दिवस. कोणतेही शुभ कार्य करण्याचा दिवस.

जंबुद्वीपात, म्हणजे आपल्या भारतवर्षात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ३ ऋतू आहेत. पावसाळा संपत आलेला असतांना शेतीची कामे जवळपास झालेली आहेत. शेतात पिके डोलायला लागली आहेत. अशा वेळी ‘दसरा’ हा सण येतो. घरातील कुळाचार संपलेले असतात आणि आता बाहेर पडून कर्तृत्व गाजवण्यासाठी मन आसुसलेले असते. या दिवशी बाहेर पडल्याने अनेकांनी विजय संपादन केले; म्हणून तो विजयाचा पायंडा पडून साडेतीन मुहूर्तात या दिवसाची प्रामुख्याने गणना होऊ लागली. १२ वर्षे वनवास संपल्यावर पांडवांना एक वर्ष अज्ञातवासात काढायचे होते. पांडवांनी स्वतःची सर्व शस्त्रे शमीच्या ढोलीत लपवून आणि वेष पालटून विराट राजाच्या दरबारी ते विविध रूपात राहू लागले. अर्जुन तर बृहन्नडा बनून नृत्यागारात राहू लागला. वर्ष संपताच विराट राजावर परचक्र आले. राजा वृद्ध आणि राजपुत्र बिनकामाचा अशा परिस्थितीत अज्ञातवासाची मुदत संपताच आश्विन शुद्ध दशमी या दिवशी शमीवृक्षाच्या ढोलीतील शस्त्रे बाहेर काढून अन् त्यांची पूजा करून पांडव युद्धभूमीवर आले. त्यांनी विराट राजाला जय मिळवून दिला तो याच दिवशी.  म्हणून आजच्या दिवशी आपण शस्त्रपूजा आणि शमीपूजा करण्याची प्रथा पाळत असतो. आपट्यांची पाने ‘सोने’ म्हणून दिली जातात. त्यानंतर वडीलधार्‍या मंडळींना सोने देऊन शुभेच्छा घ्याव्यात. या दिवशी ‘सोने घ्या, सोन्यासारखे वागा आणि सोन्यासारखे रहा’, अशा शुभेच्छा दिल्या आणि घेतल्या जातात.

८. कोजागरी पौर्णिमा 

संपत्ती मिळवणे, तिचा संग्रह करणे आणि तिचा योग्य उपभोग घेणे, यांसाठी निरोगी आयुष्य लाभणे आवश्यक आहे. या सर्व घटकांसाठी कोजागरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी, कुबेर, इंद्र आणि चंद्र यांची पूजा करतात. आश्विन पौर्णिमेला सकाळी उपवास करून रात्री जागरण करावे. या पौर्णिमेस ‘कौमुदी’ म्हटले आहे. या दिवशी दुधात शिजवलेल्या तांदुळाच्या खिरीचा (पायस) चंद्र आणि देवता यांना नैवेद्य दाखवून ती खीर चांदीच्या भांड्यात चंद्रप्रकाशात काही काळ ठेवून मग भक्षण करावी, तसेच नारळ पाणी आणि चिवडा यांचे सेवन करावे. या दिवशी रात्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला चंद्र यांचे पूजन करावे. त्यायोगे ऐश्वर्य प्राप्ती होते.

‘को-जागर्ति ? (कोण जागे आहे ?)’ असे म्हणत लक्ष्मी आपल्या घरात येत असते. तिचे स्वागत व्हावे; म्हणून या देवतांचे पूजन करून मुख्य दरवाजात तुपाचा दिवा लावावा. भगवान श्रीदत्तगुरूंनी या दिवशी परशुरामाला ‘श्री विद्या’ प्रदान केली. आपल्यालाही सर्व प्रकारचे वैभव प्राप्त व्हावे; म्हणून देवतांचे पूजन करून ‘श्रीसूक्ता’चा पाठ करावा.                             (समाप्त)

– ज्योतिषी श्री. ब.वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी), पुणे

(साभार : मासिक ‘धार्मिक’, दिपावली विशेषांक २०१७)