Karnataka minister Dinesh Gundu : (म्‍हणे) ‘वीर सावरकर ब्राह्मण असूनही गोमांस खात होते !’ – मंत्री दिनेश गुंडुराव, काँग्रेस

कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील मंत्री दिनेश गुंडुराव यांचे संतापजनक विधान !

मंत्री दिनेश गुंडुराव

बेंगळुरू (कर्नाटक) – स्‍वातंत्र्यवीर सावरकर चित्‍पावन ब्राह्मण होते, तरीही ते सार्वजनिक ठिकाणी गोमांस खायचे आणि त्‍याचा प्रसार करायचे. सावरकरांनी कधीही गोहत्‍येला विरोध केला नाही. याविषयी त्‍यांचे विचार अत्‍यंत पुढारलेले होत, असे विधान कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील आरोग्‍य आणि कुटुंब कल्‍याण मंत्री दिनेश गुंडुराव यांनी केले. मोहनदास गांधी यांच्‍या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्‍या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

म. गांधी कट्टर शाकाहारी होते !

गुंडुराव पुढे म्‍हणाले की, म. गांधी हिंदु सांस्‍कृतिक रुढीवादाचे मूर्तीमंत उदाहरण होते; मात्र ते कट्टर शाकाहारी होते. तसेच गांधी लोकशाहीवादी नेते होते. (गांधी यांनी देशाचा घात केला. त्‍यांनी भारताची आणि हिंदूंची जितकी हानी केली, तितकी मुसलमान आक्रमकांनीही केली नाही, असे म्‍हटले, तर अतिशयोक्‍ती ठरू नये ! – संपादक) महंमद अली जिना कट्टर नव्‍हते; पण वीर सावरकर कट्टर होते. (जिना यांच्‍यामुळेच देशाची फाळणी झाली, तर सावरकर फाळणीच्‍या विरोधात होते. हे काँग्रेसवाले कधीही सांगणार नाहीत !  – संपादक) काही लोक असाही दावा करतात की, जिना निषिद्ध असलेल्‍या डुकराचे मांस चवीने खायचे; मात्र जिना मुसलमानांचे नायक ठरले होते.

गोरक्षणाच्‍या नावाखाली होणारी मारहाण, हे सावरकरांचे विचार नाहीत !

मंत्री गुंडुराव म्‍हणाले की, देशात नथुराम गोडसे यांच्‍या विचारांची पाळमुळे घट्ट होत आहेत. (म. गांधी यांच्‍या आत्‍मघाती अहिंसावादी विचारांपेक्षा गोडसे यांच्‍या प्रखर राष्‍ट्रवादी विचारांची पाळेमुळे घट्ट का होत आहेत ?, याचा काँग्रेसनेच विचार केला पाहिजे ! – संपादक) याच विचाराने म. गांधी यांची हत्‍या केली. गांधी धार्मिक होते, सध्‍याच्‍या घडीला मात्र कट्टरतावाद फोफावतो आहे. गोरक्षणाच्‍या नावाखाली कुणालाही मारहाण करण्‍यात येते. हे विचार वीर सावरकरांचे नाहीत. त्‍यांचे विचार कट्टर असले, तरी दुसर्‍या बाजूने ते आधुनिक होते. सावरकरांच्‍या कट्टरतावादाचा सामना करण्‍यासाठी गांधी यांचे विचार आजही प्रेरक आहेत.

काँग्रेस खोटारडी आहे ! – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

काँग्रेस खोटारडी आहे. भारत स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही. सावरकरांकडून काँग्रेसने अद्याप कोणताच बोध घेतला नाही. काँग्रेस स्‍वातंत्र्यसैनिकांचा सन्‍मान करत नाही, हे पुन्‍हा सिद्ध झाले, अशी टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी केली. (केंद्रीय मंत्र्यांनी गुंडुराव यांच्‍यावर गुन्‍हा नोंदवण्‍यासाठी आणि त्‍यांना अटक होण्‍यासाठी सरकारी स्‍तरावर प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक)

मंत्री गुंडुराव यांच्‍यावर मानहानीचा खटला प्रविष्‍ट (दाखल) करणार ! – रणजित सावरकर

श्री. रणजित सावरकर

स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्‍हणाले की, निवडणुका येत असतांना सावरकरांची वारंवार अपकीर्ती करण्‍याची काँग्रेसची रणनीती आहे. याआधी राहुल गांधी हे करत होते. आता त्‍यांचे नेते वक्‍तव्‍य करत आहेत. हिंदु समाजाला जातींमध्‍ये विभागून काँग्रेसला निवडणुका जिंकायच्‍या आहेत. ‘फूट पाडा आणि राज्‍य करा’ या ब्रिटिशांच्‍या धोरणासारखे हे आहे. इंदिरा गांधी यांनी सावरकरांची धोरणे स्‍वीकारली होती. सावरकर गोमांस खायचे आणि ते गोहत्‍येचे समर्थन करायचे, हे गुंडुराव यांचे विधान चुकीचे आहे. मी त्‍यांच्‍यावर मानहानीचा खटला प्रविष्‍ट (दाखल) करणार आहे.

या लोकांना सावरकरांबविषयी काहीच ठाऊक नाही ! – देवेंद्र फडणवीस,  उपमुख्‍यमंत्री

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्‍ट्राचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, या लोकांना सावरकरांविषयी काहीच ठाऊक नाही. त्‍यांचा पुन्‍हा पुन्‍हा अपमान केला जात आहे. सावरकरांवर अशी खोटी विधाने करण्‍याची प्रक्रिया राहुल गांधी यांनी चालू केली आणि मला वाटते की, ते पुढे नेण्‍याचा प्रयत्न करत आहेत.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर मांसाहारी होते; मात्र त्‍यांनी कधीही गोमांस भक्षण केले नाही ! – दुर्गेश परूळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक

श्री. दुर्गेश परुळकर

सावरकरांनी कधीही गोमांस भक्षण केले नाही. तसेच त्‍यांनी गोहत्‍येचे कधीही समर्थन केले नाही. ‘युद्धाच्‍या प्रसंगी स्‍वतःचा बचाव करण्‍यासाठी जर शत्रूपक्षाकडून गायींचा कळप पुढे करून हिंदूंवर आक्रमण करण्‍याचा प्रयत्न केला, तर अशा परिस्‍थितीत वेळ पडल्‍यास गायींना मारावे लागले, तरी चालेल; पण शत्रूला जिवंत सोडू नये’, असे सावरकरांनी म्‍हटले आहे. यात ‘वेळ पडल्‍यास’ हा शब्‍दप्रयोग महत्त्वाचा आहे. त्‍याचा अर्थ ‘सर्रास गायींची हत्‍या करा’ असा अर्थ होत नाही.

मुसलमान जर हिंदूंच्‍या भावना दुखावण्‍यासाठी गायींची हत्‍या करत असतील, तर गोहत्‍या करणार्‍या अहिंदूंना हरिसिंह नलवा यांनी जशी शिक्षा केली, तशी शिक्षा करावी, असे सावरकरांनी म्‍हटले आहे.

(हरिसिंह नलवा यांनी शीख साम्राज्‍याचा विस्‍तार अफगाणिस्‍तानपर्यंत केला. त्‍यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात वचक निर्माण केला होता की, त्‍यांनी गोहत्‍येवर प्रतिबंध घातल्‍यानंतर त्‍या काळी काश्‍मीरसारख्‍या ठिकाणीही त्‍याचे पालन केले जात असे.)

संपादकीय भूमिका

  • ‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या वृत्तीचे काँग्रेसवाले ! मोगलांच्‍या घोड्यांना जसे जळी, स्‍थळी, काष्‍ठी आणि पाषणी मराठ्यांचे सैन्‍य दिसत होते, तसेच मोगलप्रेमी काँग्रेसवाल्‍यांना स्‍वातंत्र्यवीर सावरकर दिसतात आणि ते त्‍यांच्‍यावर चिखलफेक करण्‍याचा हास्‍यास्‍पद प्रयत्न करतात !
  • अशांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करून त्‍यांना कारागृहात डांबून कठोर शिक्षा करण्‍यासाठी हिंदु संघटनांनी प्रयत्न केला पाहिजे !