Thief Returns Stolen Idols : मंदिरातून चोरी केलेली मूर्ती गुपचूप परत करत चोरट्याने मागितली क्षमा !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील घटना

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – प्रयागराज जिल्‍ह्यातील गौघाट परिसरात असणार्‍या खसला आश्रमातील मंदिरातून मूर्ती चोरणार्‍या चोराने १ ऑक्‍टोबर या दिवशी स्‍वत: ही मूर्ती गुपचूप परत केली. चोरट्याने मूर्तीसमवेत क्षमायाचनेची चिठ्ठीही ठेवली. आता या मूर्तीची पुन्‍हा मंदिरात विधी करून स्‍थापना करण्‍यात येत आहे.

या आश्रमात बांधलेल्‍या मंदिराच्‍या गर्भगृहात सुमारे १०० वर्षे जुनी राधा-कृष्‍णाची अष्‍टधातूची मूर्ती स्‍थापित होती. ती २३ सप्‍टेंबर या दिवशी चोरीला गेली होती. याची पोलिसांत तक्रारही करण्‍यात आली होती. मूर्ती चोरीला गेल्‍याने दुःखी झालेल्‍या महंत जयराम दास यांनी अन्‍नत्‍याग केला. आश्रमातील इतरांनाही वाईट वाटू लागले. त्‍यानंतर अचानक १ ऑक्‍टोबरला पहाटे चोरट्याने मूर्ती मंदिराजवळ ठेवली. मूर्तीसमवेतच चोराने महंतांना उद्देशून क्षमायाचना करणारी चिठ्ठीही ठेवली. यात त्‍याने म्‍हटले की, माझ्‍या मुलाची प्रकृतीही बिघडली आहे. थोड्या पैशांसाठी मी खूप घाणेरडे काम केले आहे. मूर्ती विकण्‍याचा मी पुष्‍कळ प्रयत्न केला. माझ्‍या चुकीबद्दल क्षमा मागून मी मूर्ती परत करत  आहे. मी तुम्‍हाला विनंती करतो की, मला क्षमा करा आणि देवाला पुन्‍हा मंदिरात बसवा. आमच्‍या मुलांना क्षमा करा आणि तुमची मूर्ती स्‍वीकारा.