लव्ह जिहाद, भूमी जिहाद यांच्या विरोधात संघटितपणे लढा देण्याचा संत-महंत यांचा निर्धार !
महंत रामगिरी महाराज यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याचे आवाहन !
कोल्हापूर येथे ‘संत समावेश’ सोहळा
कोल्हापूर – लव्ह जिहाद, भूमी जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात समाजातील संत-महंतांनी स्वतःचा संप्रदाय, मठ आणि पोटजाती यांचा विचार न करता हिंदु धर्मासाठी संघटित होऊन हिंदूंच्या रक्षणासाठी लढा देण्याचा निर्धार येथे झालेल्या संत संमेलनात घेण्यात आला. या वेळी महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचे सर्व संत-महंत यांनी समर्थन करून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याचे आवाहनही या ‘संत समावेश’ सोहळ्यात करण्यात आले.
हिंदूंनी पोटजाती विसरून केवळ हिंदू म्हणून संघटित होऊन बुद्धीवादी, पुरोगामी आणि समाजकंटक यांच्या विरोधात लढा दिल्यानंतरच हिंदु धर्म सुरक्षित राहील, असा विचारप्रवाह या संमेलनात सर्व संत-महंतांनी स्वत:च्या मनाेगतातून व्यक्त केला.
‘संत समावेश’ सोहळ्यात २ सत्रांत संत-महंत यांनी मांडलेले विचार…
- ह.भ.प. शाम महाराज राठोड म्हणाले की, हिंदूंना ‘लव्ह जिहाद’कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील कायदा होईपर्यंत हिंदु तरुणींचे रक्षण होण्यासाठी या तरुणींना स्वतःजवळ शस्त्र ठेवण्याची अनुमती सरकारने द्यावी. मोठी माणसे म्हणजे सज्जन मौनी रहातात, तेव्हा राष्ट्राची हानी होते, याचे वाईट वाटते. निवडणुकीच्या वेळी मते देण्याविषयी फतवे काढले जातात, तसे फतवे मठाधिपती मठातून पत्रकाद्वारे का काढत नाहीत ? द्वेष, मत्सर नष्ट केल्याविना हिंदूंची वज्रमूठ रहाणार नाही. ह.भ.प. सुधीरआप्पा महाराज म्हणाले की, शासनाने गायरानातील गायींना चारा देण्यासाठी ५० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र मोकळ्या गायींसाठी असलेली गायरानच जप्त केलेली आहेत, ती प्रथम दिली पाहिजे. सर्व संत महंत कार्य करत असतांना सनातनखाली एकत्र आले पाहिजे. महाराष्ट्रात पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर ही मोठी तीर्थक्षेत्रे घोषित करा. तेथे मद्य, मांस, गांजी यांची विक्री होता कामा नये. कितीही संप्रदाय असले, तरी आपण सनातनी आहोत, हे लक्षात ठेवा.
- ह.भ.प. बापू महाराज रावकर म्हणाले की, अंनिसवाल्यांकडून सतत हिंदु धर्म, देवता, संत यांच्या विरोधात अप्रचार करून समाजात बुद्धीभेद केला जात आहे. अंनिसचे शाम मानव हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांना थोतांड समजतात. हिंदु धर्माची अपर्कीती करणारे शाम मानव यांची जादूटोणाविरोधी शासकीय समितीतून हकालपट्टी करावी, तसेच तेथे वारकरी संप्रदायातील वारकर्यांचा समितीत अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, ह.भ.प. साखरे महाराज, वारकरी यांची नियुक्ती करावी.
- ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेसच्या काळात देशात १०८ पैकी केवळ २८ ते ३० गायींच्या जाती शिल्लक राहिल्या. अनेक गायींच्या हत्या केल्याने, हे गोहत्येचे पाप आहे. काँग्रेस ही अधर्माच्या बाजूने असल्याने तिला निवडून देऊ नये.
- ह.भ.प. आदिनाथ शास्त्री महाराज पारनेरकर म्हणाले की, हिंदु धर्मावर आघात होत असतांनाही हिंदूंचे रक्त गरम होत नाही. हिंदूंची मराठा, ब्राह्मण, चांभार, कुंभार यांत विभागणी न करता हिंदू म्हणून एकत्रित आले पाहिजे.
- ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हिंदु धर्माचे खच्चीकरण केले जात आहे. महंत रामगिरी महाराज यांनी केलेले वक्तव्य खरे आहे. झाकीर नाईक बोलतो, त्या वेळी कुणी टीका करत नाही. कीर्तनकारांनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात गावांत हिंदूंचे प्रबोधन करावे.
जादूटोणाविरोधी समितीतूनशाम मानव यांची हकालपट्टी करावी ! – ह.भ.प. मारुती शास्त्री महाराज तुणतुणे
जादूटोणाविरोधी समितीमधून अंनिसचे शाम मानव यांची हकालपट्टी करून ही समिती विसर्जित करावी. शाम मानव इतर पंथांवर टीका न करता केवळ हिंदु धर्मावर घाला घालतात. मानव यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतील फरक कळत नाही. या शब्दांचे ते एकत्रिकरण करून ते समाजात हिंदु धर्माविषयी समाजात भ्रमिनरास निर्माण करतात. |