कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
कोल्हापूर – कोल्हापूरच्या दसर्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही दसर्याच्या दिवशी ऐतिहासिक पद्धतीने सीमोल्लंघन होणार असून या शाही दसर्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ३ ऑक्टोबर या दिवशी भवानी मंडप परिसर येथे सायंकाळी ५ वाजता दसरा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राची शक्तीपीठे आणि ‘गौरव माय मराठीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन असून अन्य विविध दिवसांत पारंपरिक वेशभूषा दिवस असून एक दिवस युद्धकलांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दसरा महोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, ७ ऑक्टोबर या दिवशी भवानी मंडप परिसर येथे १० पथकांचे युद्धकला प्रात्यक्षिक सादरीकरण होईल. ८ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ८ वाजता विविध क्षेत्रांतील महिलांच्या सहभागातून ‘नवदुर्गा बाईक रॅली’चे आयोजन केले आहे. १२ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर दसर्यानिमित्त शाही स्वारीचे आयोजन केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, ढोलवादन पथके, लेझीम पथके, झांज पथक, शिवकालीन वेशभूषेमधील मावळे, मर्दानी खेळाची पथके, मल्लखांब पथके, ११ घोड्यांसमवेत ११ मावळे, १० मावळे-अब्दागिरीसह यांचा समावेश असणार आहे.