दसरा सण ‘हिंदु संस्कृती रक्षण दिन’ म्हणून साजरा करावा !

अहिल्यानगर येथे प्रथमच दसर्‍यासाठी थाटणार पारंपरिक वेशभूषेचे कक्ष !

पारंपरिक स्टॉलसंबंधी माहिती देतांना श्री. बापू ठाणगे, कु. प्रतीक्षा कोरगावकर, शिल्पकार प्रमोद कांबळे आणि अन्य मान्यवर

हिंदु धर्मियांना खरेदीसाठी आवाहन !

अहिल्यानगर – दसरा सण हा ‘हिंदु संस्कृती रक्षण दिन’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन येथील समस्त हिंदु संप्रदाय आणि समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. शहरात प्रथमच दसरा सणासाठी पारंपरिक वेशभूषांचे कक्ष थाटण्यात येणार आहेत. या दिवशी शहरातील सर्व हिंदु धर्मियांनी पारंपरिक पोषाख परिधान करून आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा. ७ ते ९ ऑक्टोबरला देहलीगेट येथे आणि प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये थाटण्यात येणार्‍या स्टॉलवरून शहरातील हिंदु संस्कृतीप्रेमींनी आपल्या परिवारासाठी आवश्यक खरेदी करावी, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. बापू ठाणगे, प्रसिद्ध शिल्पकार श्री. प्रमोद कांबळे, श्री स्वामी समर्थ केंद्राचे श्री. अजिंक्य गायकवाड, इस्कॉनचे श्री. गिरवरधारी प्रभु, नाथभक्त श्री. मिलिंद चवंडके, हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर आदींनी केले आहे. भरत शिंदे आणि संजय जोशी यांनी दुर्गामाता दौडसंबंधी माहिती दिली.

दुर्गामाता दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ! 

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने काढलेली दुर्गामाता दौडमध्ये सर्वांनी प्रतिदिन सकाळी ७ वाजता सहभागी व्हावे. आई जगदंबेची उपासना-आराधना म्हणजे दुर्गामाता दौड आहे. हिंदु धर्मामधील पराक्रम तेवत ठेवण्यासाठी आणि आई भवानी देवीकडून संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळवण्यासाठी ‘दुर्गामाता दौड’चे आयोजन केले जाते. देवी-देवतांचा जयघोष करत देशभक्तीपर गीतांचे गायन करत ही दौड चालते. पारंपरिक पोषाख परिधान करून या दुर्गामाता दौडमध्ये शहरवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सावेडी उपनगरातही दौडचे आयोजन केले जाते आहे.