संपादकीय : ‘युद्ध आमुचे सुरू’ !
अपेक्षेप्रमाणे इराणने इस्रायलवर संपूर्ण क्षमतेनिशी आक्रमण करून इस्रायलचा सूड उगवण्याचा प्रयत्न केला. या आक्रमणाने केवळ मध्यपूर्व किंवा पश्चिम आशियातील देशांची धाकधूक वाढली आहे असे नाही, तर जगातील बहुतांश देशांचे धाबे दणाणले आहेत; कारण आता या आक्रमणाला इस्रायल निःसंशयपणे चोख प्रत्युत्तर देईल, किंबहुना त्याने तशी घोषणासुद्धा केली आहे. अमेरिकेनेही इराणला गंभीर परिणाम भोगायला सिद्ध रहाण्याची धमकी दिली आहे. म्हणूनच इराणचे आक्रमण तिसर्या महायुद्धाची नांदी म्हणावी लागेल.
‘गेल्या वर्षी हमासने इस्रायलवर आक्रमण केल्यामुळे हे युद्ध चालू आहे’, असे सकृतदर्शनी कुणालाही वाटू शकेल; पण त्याचा ‘मास्टरमाईंड’ इराणच होता, हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे. इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यात होऊ घातलेल्या ऐतिहासिक कराराला इराणचा कडवा विरोध होता. तो करार होण्याच्या तोंडावरच इराणने हमासच्या माध्यमातून इस्रायलवर आक्रमण केले. त्याची किंमत इराणला आज ना उद्या मोजावी लागणार होती, ती तो मोजत आहे. आता ‘इस्रायलवर आक्रमण करून इराणने स्वतःची ‘कबर’ खोदली आहे’, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. इस्रायल आता कशा प्रकारे आणि कुठल्या माध्यमातून इराणचा सूड उगवेल ?, याकडे जग श्वास रोखून पहात आहे. इस्रायलने प्रथम हमासचे कंबरडे मोडून पॅलेस्टाईनला स्पष्ट संदेश दिला. येथपर्यंत ‘हा संघर्ष दोन देशांपुरताच सीमित आहे’, असे वाटले. तथापि हमास ही आतंकवादी संघटना असूनही इराणसह अनेक इस्लामी देशांनी हमासला उघडपणे पाठिंबा देत इस्रायलला ललकारले. लेबनॉनने पाळलेल्या ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेने ‘हमास’साठी इस्रायलवर आक्रमण केले. तेव्हा इस्रायलने हिजबुल्लावर अफलातून आक्रमण करून त्याचे समूळ उच्चाटन केले. या दोन्ही आतंकवादी संघटनांना पाठिंबा देत येमेनने पाळलेल्या ‘हुती’ या तिसर्या आतंकवादी संघटनेने इस्रायलला ललकारले. त्यावर इस्रायलने ‘हिजबुल्ला’नंतर आता ‘हुती’चा क्रमांक आहे’, अशी उघडपणे धमकी देऊन येमेनच्या उरात धडकी भरवली. विशेष म्हणजे या तिन्ही आतंकवादी संघटना, म्हणजे हमास, हिजबुल्ला आणि हुती यांना इराणच पोसत आहे; म्हणूनच तो या संपूर्ण घडामोडींचा ‘मास्टरमाईंड’ आहे. इस्रायल या सर्वांना पुरून उरला नव्हे, तर संपवून उरला आहे; म्हणून अंततः आता इराण स्वतःच युद्धमैदानात उतरला आहे. जसे एखादा राजा प्रथम स्वतः लढाईत न उतरता त्याची प्यादी उतरवतो आणि त्या प्यादांचे काही चालले नाही की, मग स्वतः लढाईत उतरतो. अगदी तसेच इराणचे झाले आहे. या सर्व घडामोडींवरून ‘एका ठिणगीचे रूपांतर हळूहळू युद्धात कसे होते ?’, हे लक्षात येते.
इराण आणि इस्रायल यांच्यात एवढे हाडवैर का आहे ?, हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे; पण इस्रायलला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यापासून ते त्याच्या संयुक्त राष्ट्रातील समावेशापर्यंतच्या सूत्रांना इराणने वेळोवेळी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. आखाती युद्धानंतर इराणने वर्ष १९९२ मध्ये अर्जेंटिनातील इस्रायली दूतावासावर केलेले आक्रमण आणि वर्ष १९९४ मध्ये केलेले आणखी एक आत्मघाती आक्रमण इस्रायलच्या चांगलेच जिव्हारी लागले. त्याचा सूड उगवत इस्रायलने इराणमधील ‘पीपल्स मुजाहिदीन ऑफ इराण’ आणि ‘जुदल्लाह’ या गटांना पाठिंबा देत इराणमध्ये अनेक वेळा विध्वंस घडवून आणला. तेव्हापासून इराण इस्रायलच्या मुळावर उठला आहे. हे सर्व पहाता हमासने इस्रायलवर केलेले आक्रमण हे केवळ निमित्त म्हणावे लागेल. खरे युद्ध हे इस्रायल आणि इराण यांच्यातीलच आहे, हे स्पष्ट होते. तसे नसते, तर हमास आणि हिजबुल्ला यांचे कंबरडे मोडल्याचा त्रास इराणला कशाला झाला असता ? या संघर्षात इस्रायलने कुठल्याही देशावर नव्हे, तर त्यांचा आश्रय घेऊन रहाणार्या आतंकवादी संघटनांवर आक्रमण केले आहे. याउलट इराणने थेट इस्रायलवर कारवाई केली आहे. याच सूत्रावर संयुक्त राष्ट्रांत स्पष्टीकरण देता देता इराणच्या तोंडाला फेस येणार आहे. यामुळे ‘इराण हा जगभरातील आतंकवाद्यांचा आश्रयदाता आहे’, हे सिद्ध होईल आणि त्याला त्याची किंमत मोजावी लागेल. हे अमेरिका आणि इस्रायल यांचे इराणविरुद्धचे ‘पॉलिसी वॉर’ असेल.
अमेरिका संधी साधणार !
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष जगजाहीर आहे. दोघे नेहमीच एकमेकांना संपवण्याची भाषा करतात. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या निमित्ताने इराणचा काटा काढण्याची आयती संधी अमेरिकेकडे चालून आली आहे. इराणचे अमेरिकेशीही हाडवैर आहे. या संपूर्ण संघर्षात जसे इराण हा पॅलेस्टाईन, लेबनॉन आणि येमेन यांच्या मागे उभा आहे, तशी अमेरिकाही इस्रायलच्या मागे ठामपणे उभी आहे. इराण-इस्रायल संघर्षात सैन्यसामुग्रीच्या संदर्भात इराण इस्रायलपेक्षा वरचढ असला, तरी चिवट लढा देऊन शत्रूच्या तोंडातील विजय खेचून आणण्यात इस्रायल निष्णात आहे. अशा इस्रायलला बलाढ्य अमेरिकेची साथ लाभल्याने सध्या तरी तो इराणवर भारी पडेल, असे चित्र आहे. त्यामुळे खर्या अर्थाने ‘युद्ध आमुचे सुरू’ अशी या देशांची स्थिती आहे.
भारताची भूमिका काय ?
‘दूरवर चालू असलेले युद्ध आपल्यापर्यंत येणार नाही’, असे आज कुठलाही देश म्हणू शकत नाही. आपण तर नाहीच नाही. अमेरिका आणि इराण यांच्यापैकी कुणाच्या बाजूने उभे रहाणार ?, याचा ठोस निर्णय आपल्याला लवकरच घ्यावा लागेल. अशा वेळी अध्यारूत निर्णय चालत नसतात, ते अधिक घातक ठरतात. अमेरिकेची बाजू घेतली, तर इराण आपला तेल पुरवठा थांबवेल आणि इराणची बाजू घेतली, तर अमेरिका शस्त्रपुरवठ्यासह आपले सर्वच साहाय्य थांबवेल. अशा वेळी निर्णय घेण्यात आपला कस लागणार आहे. त्यात आपल्यासमोर पाकिस्तान आणि चीन यांच्या आक्रमणांसह अंतर्गत गृहयुद्धाचाही धोका आहेच. या सर्वांचा सांगोपांग विचार करून आताच भूमिका आणि रणनीती ठरवावी लागेल. ‘The more you sweat in peace, the less you bleed in war’, (अर्थ : शांतताकाळात जेवढा घाम गाळाल, तेवढे युद्धकाळात रक्त कमी सांडते), असे म्हटले जाते. त्यामुळे सध्याच्या शांतता काळात आपण घाम गाळला (युद्धाला सामोरे जाण्याची सिद्धता केली), तर प्रत्यक्ष युद्धकाळात रक्ताचे पाट वहाण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.
तिसर्या महायुद्धाचे पडघम वाजत असतांना भारताने संभाव्य धोके ओळखून त्याला सामोरे जाण्याची सिद्धता केली पाहिजे ! |