नवरात्रीच्या काळात झालेल्या यागांचे प्रक्षेपण पहातांना सुकापूर (पनवेल) येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची बालसाधिका कु. गिरिजा संतोष खटावकर (वय ७ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

‘नवरात्रीच्या काळात रामनाथी आश्रमात दशमहाविद्या याग झाले. देवद आश्रमात त्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. त्या वेळी मी माझ्या दोन्ही मुलींना घेऊन देवद आश्रमात जात होते. तेव्हा माझी मोठी मुलगी कु. गिरिजा संतोष खटावकर (आध्यात्मिक पातळी ५५ टक्के, वय ७ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

गिरिजा खटावकर

 

१. अत्तराची आहुती देण्यापूर्वी अत्तराचा आणि कापूर-आरतीपूर्वी कापराचा सुगंध येणे

अ. १९.१०.२०२३ या दिवशी यज्ञाच्या वेळी पुरोहितांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा निलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना अत्तराची आहुती देण्यास सांगितले. तसे त्यांनी सांगण्यापूर्वीच कु. गिरिजा मला म्हणाली, ‘‘मला अत्तराचा सुगंध येत आहे.’’ त्यानंतर लगेचच पुरोहितांनी अत्तराची आहुती देण्यास सांगितले.

आ. २०.१०.२०२३ या दिवशी कापूर-आरती चालू होण्यापूर्वीच तिला कापराचा सुगंध आल्याचेही तिने मला सांगितले.

२. २४.१०.२०२३ (विजयादशमी) या दिवशी आलेल्या अनुभूती

सौ. सुप्रिया खटावकर

२ अ. यज्ञ चालू असतांना कु. गिरिजाची बराच वेळ भावजागृती होऊन तिच्या डोळ्यांतून अश्रू येत होते.

२ आ. पूर्णाहुती पूर्वी ‘यज्ञातून बाहेर पडणारा धूर तिच्याजवळ आला आहे’, असे तिला जाणवले आणि प्रत्यक्षातही त्या धुरामुळे तिच्या डोळ्यांतून पाणी आले होते.

२ इ. कमळ फुलाची छायाचित्रे दाखवून त्याविषयी माहिती सांगत असतांना कु. गिरिजाला ‘प्रत्यक्ष कमळ त्या पाण्यातून वर येत आहे, त्या कमळात ५ घोड्यांचा रथ, रथामध्ये सोनेरी सिंहासन आणि सिंहासनात प्रभु रामचंद्र बसलेले आहेत’, असे दिसणे : कमळ फुलाविषयी छायाचित्रे दाखवून माहिती सांगितली जात असतांना तिला ‘प्रत्यक्ष कमळ त्या पाण्यातून वर येत आहे’, असे दिसले. त्यानंतर तिला ‘त्या कमळात ५ घोडे असलेला रथ असून त्या रथामध्ये दोन्ही बाजूंना सिंहाचे चित्र असलेले सोनेरी सिंहासन दिसले. त्या सिंहासनावर प्रभु रामचंद्र बसले असून त्यांचे उपरणे भगवे आणि धोतर आकाशी निळे होते अन् ते आनंदी दिसत होते’, असे दिसले.

२ ई. यज्ञ संपण्यापूर्वी तिला शक्तीहीन झाल्यासारखे जाणवले आणि तिला तिच्या सहस्रारावर दाब जाणवला.’

– सौ. सुप्रिया संतोष खटावकर (कु. गिरिजाची आई), सुकापूर, पनवेल. (९.११.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक