धर्मादाय रुग्णालयांतील खाटांची घरबसल्या माहिती

‘उपमुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्य कक्षा’च्या ऑनलाईन प्रणालीचे उद्घाटन !

उपमुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्य कक्षाच्या ऑनलाईन प्रणालीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई – उपमुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्य कक्षाच्या ऑनलाईन प्रणालीचे २ ऑक्टोबर या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील सस्मिता इमारतीमध्ये उद्घाटन झाले. या प्रणालीमुळे राज्यातील धर्मादाय रुग्णालयात गरीब आणि निर्धन रुग्णांसाठी असलेल्या खाटा उपलब्ध आहेत का ? याची माहिती घरबसल्या कळू शकणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय साहाय्य कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक उपस्थित होते. राज्यातील ४६८ रुग्णालयांमधील १२ सहस्र खाटा निर्धन आणि दुर्बल घटकांना उपलब्ध आहेत. ‘https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in/’ या संकेतस्थळास याविषयीची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे. याविषयी माहिती देतांना उपमुख्यमंत्री राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय साहाय्य कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, मागील १० महिन्यांत उपमुख्यमंत्री राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय साहाय्य कक्षाद्वारे ३२३ रुग्णांना गंभीर आजारांसाठी साहाय्य करण्यात आले असून त्यासाठी १२ कोटी ७३ लाख रुपये इतकी रक्कम व्यय करण्यात आली.

धर्मादाय संस्थांकडून आर्थिक दुर्बल घटकांना साहाय्य देणार ! – फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा विनामूल्य आणि सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय संघटना आणि वैद्यकीय कक्ष समन्वयाने काम करत आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कागदपत्रांचे ‘स्कॅनिंग’ आणि ‘डिजिटायजेशन’ यामुळे सुकर होईल. कामामध्ये वेग आणि पारदर्शकता आणता येईल. गरजू रुग्णांना शासनाच्या ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’, ‘पीएम् केअर फंड’, ‘मुख्यमंत्री साहायता निधी’ यांचे साहाय्य कक्षाद्वारे मिळवून देण्यात येत आहे. वैद्यकीय साहाय्य करणार्‍या विविध धर्मादाय संस्थांकडून साहाय्य मिळवून दिले जाईल.

हेल्पलाईन क्रमांक २४ घंटे कार्यरत !

आपत्तीच्या काळात धर्मादाय रुग्णालयामध्ये तात्काळ उपचार मिळावेत, याकरता उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या अंतर्गत हेल्पलाईन चालू करण्यात आली आहे. १८००१२३२२११ या क्रमांकावर ही सेवा २४ घंटे उपलब्ध रहाणार आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर रुग्णांना योजनेविषयीची माहिती, अर्ज कुठे करावा, याविषयी माहिती देण्यात येणार आहे.