हे विश्वाची जननी आणि वात्सल्यमय जगन्माता ।
३.१०.२०२४ या दिवसापासून चालू होणार्या शारदीय नवरात्रीनिमित्त सुश्री (कु. ) मधुरा भोसले यांना सूचलेले काव्य येथे देत आहोत.
वनप्रदेशाचे रक्षण करणारी हे वनदुर्गा ।
अग्नीरूपी ज्वाला स्वरूपातील हे अग्निदुर्गा ।। १ ।।
सत्कर्माला यश प्रदान करणारी हे जयदुर्गा ।
शत्रूवर विजय प्राप्त करून देणारी हे विजयादुर्गा ।। २ ।।
हे नीलकंठ महेश्वराची सहधर्मचारिणी हे नीलकंठी दुर्गा ।
हे विंध्याचल वासिनी हे विंध्यवासिनी दुर्गा ।। ३ ।।
महारूद्र शिवाशी एकरूप असणारी हे रुद्रांश दुर्गा ।
चित्ताला शांतीची अनुभूती देणारी हे शांतादुर्गा ।। ४ ।।
भय नष्ट करून भक्तांना अभय देणारी हे अभय दुर्गा ।
वैदिक धर्माचे संरक्षण करणारी हे आर्यादुर्गा ।। ५ ।।
नऊ रूपे धारण करून कार्य करणारी हे नवदुर्गा ।
नवरात्रीत असुरांशी घनघोर युद्ध करणारी हे नवदुर्गा ।। ६ ।।
हे विश्वाची जननी आणि वात्सल्यमय जगन्माते ।
तुझ्या चरणी कोटीशः वंदन करते हे दुर्गामाते ।। ७ ।।
आम्हा भक्तांवर भरभरून कृपा करावी हे माते ।
या संसाररूपी भवसागरातून तारून न्यावे आता ।। ८ ।।
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०२४)