आईच्या मायेने साधकांची काळजी घेणार्या सनातनच्या संत पू. रेखा काणकोणकर (वय ४७ वर्षे) !
‘मला काही वेळा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करण्याची संधी मिळते. तेव्हा मला पू. रेखाताई (सनातनच्या ६० व्या संत पू. रेखा काणकोणकर) यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळते. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
पू. रेखा काणकोणकर यांना ४७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! |
१. साधकांची काळजी घेणे
‘एखाद्या साधकाला बरे वाटत नसल्यास किंवा काही अडचण असल्यास पू. रेखाताई त्याला चिकित्सालयात जायला सांगतात. साधकांना आवश्यक असल्यास पू. ताई त्यांना विश्रांती घेण्यासाठीही पाठवतात. सेवा करतांना साधकाचे मन सेवेत विचलित होत असल्यास पू. ताई त्याला नामजपादी उपाय करायला सांगतात.
२. स्थिर आणि शांत
एखाद्या वेळी एखादा पदार्थ अल्प पडल्यास पू. ताई अस्थिर होत नाहीत. त्या स्थिर राहून लगेच त्यावर उपाययोजना करतात. काही वेळा साधकसंख्या अल्प असते; मात्र पू. ताई अन्य साधकांना त्याची जाणीव करून देत नाहीत. त्या वेळी उपस्थित साधकांकडून तेवढ्याच वेळेत सेवा पूर्ण होते.
३. प्रीती
गोवा येथे मे मासात कडक उन्हाळा असतो. त्या वेळी पू. ताई साधकांसाठी सकाळी आणि संध्याकाळी थंडगार सरबत बनवून देण्याचे नियोजन करतात. काही विशेष पदार्थ केला असल्यास पू. ताई लहान वयाच्या साधकांना तो पदार्थ आठवणीने घ्यायला सांगतात आणि सर्वांना त्याची आठवण करून देतात. एखादा साधक सेवेनिमित्त बाहेर गेला असल्यास पू. ताई त्याच्यासाठी आठवणीने पदार्थ बाजूला काढून ठेवायला सांगतात.
४. साधकांची साधना व्हावी, अशी तळमळ
एखादा साधक वेळेत सेवेला आला नाही, तर पू. ताई त्याला त्याची जाणीव करून देतात. एखाद्या साधकाकडून पुनःपुन्हा तशीच चूक होत असल्यास पू. ताई त्याला कठोर शब्दांत चुकीची जाणीव करून देतात आणि प्रायश्चित्तही घ्यायला सांगतात.
‘श्रीमन्नारायणस्वरूप प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला पू. रेखाताईंकडून शिकायला मिळाले आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये लक्षात आली’, त्याबद्दल मी गुरुदेव अन् पू. रेखाताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. प्रकाश राऊत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.७.२०२४)
पू. रेखाताईंनी सांगितल्याप्रमाणे एका केळ्याचा हलवा बनवणे, हलवा पूर्ण भांडे भरून होणे आणि सेवेतून आनंद मिळणे
‘२१.९.२०२३ या दिवशी माझी स्वयंपाकघरातील सेवा संपल्यावर मला तेलाच्या भांड्यावर ठेवलेले एक केळे दिसले. त्याविषयी मी पू. रेखाताईंना विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘ते केळे सोलून त्याच्या चकत्या करा आणि हलवा बनवा.’’ माझ्या मनात ‘एका केळ्याचा हलवा कसा करायचा ?’, असा विचार येत होता. तेव्हा मी साधना म्हणून पू. ताईंचे म्हणणे स्वीकारले आणि हलवा बनवण्यास घेतला. केळीच्या चकत्या तुपात परतल्यावर त्या थोड्या मऊ झाल्या. नंतर मी ते पू. ताईंना दाखवले. त्या म्हणाल्या, ‘‘साखर घाला.’’ मी थोडी साखर घातली. परत थोड्या वेळाने त्यांना नेऊन दाखवले. त्या म्हणाल्या ‘‘डब्यात असलेले मापाचे भांडे भरून साखर घाला.’’ तेव्हा ‘साखर अधिक होईल’, असे मला आणि अन्य २ साधिकांना वाटले. तरीही मी पू. ताईंनी सांगितल्याप्रमाणे साखर घालून हलवा बनवला आणि एका भांड्यात ओतला. तेव्हा ते भांडे पूर्ण भरले. हे पाहून मला आणि सहसाधिकेला आश्चर्य वाटले. मला हलवा बनवण्याच्या सेवेतून आनंद मिळाला.’
– सौ. संगीता चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |