प्रत्येक नवरात्रोत्सव मंडळाने मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत ! – ओम बिर्ला, अध्यक्ष, लोकसभा
मुंबई – भारतातील तरुणींमध्ये श्री दुर्गादेवीप्रमाणे शक्ती आणि सामर्थ्य यावे, त्यांच्यात अन्याय आणि अत्याचार यांचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होऊन आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी प्रत्येक नवरात्रोत्सव मंडळाने ‘हर घर दुर्गा’ हे अभियान राबवावे. याद्वारे मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, असे आवाहन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.
महाराष्ट्राच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे ‘हर घर दुर्गा’ अभियान चालू करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर या दिवशी या अभियानाचा शुभारंभ ओम बिर्ला यांच्या हस्ते झाला. या वेळी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, अभिनेत्री अदा शर्मा आदी उपस्थित होते. या वेळी ओम बिर्ला म्हणाले, ‘‘स्वसंरक्षणाचे धडे मिळाले, तर युवतींच्या जीवनाला नवी दिशा मिळेल. भविष्यात हे अभियान देशभर राबवले जाईल.’’
‘आयटीआय’च्या प्रशिक्षण वर्गात युवती आणि महिला सहभागी होऊ शकतात ! – मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकासमंत्री
महिलांना संरक्षण करता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शहरात हे अभियान चालू केले आहे. या अभियानाद्वारे राज्यातील शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये वर्षभर आठवड्यातून २ – ३ तासिका स्वरूपात हे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या युवती आणि महिला याही सहभागी होऊ शकतात. या वेळी अभिनेत्री आदर्श शर्मा यांनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली.