Madras HC Order On Isha Foundation : सद़्गुरु जग्गी वासुदेव यांच्या आश्रमात जाऊन पोलिसांची चौकशी
मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर कारवाई
चेन्नई (तमिळनाडू) – ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद़्गुरु जग्गी वासुदेव यांच्या कोइम्बतूर येथील आश्रमात जाऊन पोलिसांनी काहींची चौकशी केली. एका माजी प्राध्यापकाने त्याच्या २ मुलींना आश्रमात डांबून ठेवल्याचा आरोप करत मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. न्यायालयाने या प्रकरणाची नोंद घेत ईशा फाउंडेशनशी संबंधित सर्व प्रकरणांची एक सूची बनवून न्यायालयासमोर सादर करण्याचा आदेश दिला होता.
१. एस्. कामराज नामक व्यक्तीने न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करून ईशा फाऊंडेशनवर गंभीर आरोप केले होते. एस्. कामराज यांनी त्यांच्या २ मुली गीता कामराज ऊर्फ माँ माथी (वय ४२ वर्षे) आणि लता कामराज ऊर्फ माँ मायू (वय ३९ वर्षे) यांना आश्रमात कोंडून ठेवण्यात आले असून त्यांना संन्यास घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप याचिकेत केला होता.
२. ‘आम्हाला ईशा फाउंडेशनमध्ये बलपूर्वक कोंडून ठेवले नसून आम्ही तिथे स्वेच्छेने रहात आहोत’, असे या दोन्ही महिलांनी न्यायालयात सुनावणीच्या वेळी सांगितले होते.
३. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस्.एम्. सुब्रह्मण्यम् आणि व्ही. शिवाग्नम् यांनी सद़्गुरु जग्गी वासुदेव यांच्या कारभारावर बोट ठेवले होते आणि ईशा फाउंडेशनशी संबंधित सर्व प्रकरणांचे अन्वेषण करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. त्यानंतर १ ऑक्टोबर या दिवशी सुमारे १५० पोलिसांनी कोइम्बतूर येथील ईशा योगकेंद्रामध्ये झडती घेतली.
४. ‘पोलिसांनी झडती घेतली नसून पोलीस केवळ चौकशीसाठी आले होते’, अशी माहिती योगकेंद्राने दिली. केंद्रातील रहिवासी आणि स्वयंसेवक यांची माहिती, त्यांची जीवनशैली, तसेच ‘ते येथे कसे आले ?’, याविषयी माहिती घेण्यात आल्याचे संस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.