Israel Iran Conflict : इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ आणि जागा आम्ही निवडू ! – इस्रायल
|
तेहरान (इराण) / तेल अविव (इस्रायल) – इराणने १ ऑक्टोबरच्या रात्री इस्रायलवर १८० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले; मात्र यांतील बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली. इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ या क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीने ही क्षेपणास्त्रे नष्ट केली. त्यातूनही सुटलेली काही क्षेपणास्त्रे इस्रायलमध्ये पडली. यांतील एक क्षेपणास्त्र इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’च्या मुख्यालयजवळ पडले. या आक्रमणात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इराणने आक्रमण करतांना मोसादचे मुख्यालय, नेवाटीम आणि टेल नोफ येथील वायूदलांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले होते. इराणने दावा केला आहे की, या आक्रमणात इस्रायलची एफ्-१५ ही लढाऊ विमाने नष्ट झाली आहेत. इस्रायलने त्याच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे नागरिक बंकरमध्ये थांबले आहेत. या आक्रमणावर इस्रायलच्या सैन्यदलाने म्हटले की, आम्ही इराणला सोडणार नाही. या आक्रमणांना नक्कीच प्रत्युत्तर दिले जाईल. त्यासाठी वेळ आणि जागा आम्ही स्वतः निवडू.
⚠️ We will choose the time and place to respond to Iran” – PM Netanyahu, Israel
💥 Iran launches 180 missiles🚀 at Israel
Only 1 fatality, 2 injured despite massive attack
💸 #OilPrices surge globally; Petrol-Diesel prices likely to increase in India as well
🌎 International… pic.twitter.com/RdCNnSVgsp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 2, 2024
इस्रायलने हिजबुल्लाचा लेबनॉनमधील प्रमुख हसन नसरूल्ला, हमासचा नेता इस्माईल हानिये आणि इराणचा रेव्होल्युशनरी गार्ड्सचा डेप्युटी कमांडर अब्बास निलफोरौशन यांची हत्या केल्यानंतर त्याचा सूड उगवण्यासाठी इराणने आक्रमण केल्याचे सांगितले जाते.
आम्ही इस्रायलच्या आक्रमणाला प्रत्युत्तर दिले आहे ! – इराण
या आक्रमणानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझाकियान म्हणाले की, आम्ही इस्रायलच्या आक्रमणाला प्रत्युत्तर दिले आहे. इराणचे हित आणि नागरिकांचे रक्षण यांसाठी हे आवश्यक होते.
इराणने मोठी चूक केली आहे ! – बेंजामिन नेतान्याहू
इराणच्या आक्रमणानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले की, इराणने आमच्यावर क्षेपणास्त्रे डागून पुष्कळ मोठी चूक केली आहे. त्यामुळे त्याने आता परिणामांसाठी सिद्ध रहावे. या आक्रमणाची इराणला मोठी किंमत चुकवावी लागेल. जो कुणी आमच्यावर आक्रमण करील, त्याला आम्ही आक्रमणाचे उत्तर देऊ. इराणच्या आक्रमणाला आम्ही परतवून लावले आहे. या अपयशी आक्रमणाला लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल. हमास आणि हिजबुल्ला यांची जी अवस्था केली आहे, तीच इराणची केली जाईल, असेही त्यांनी म्हटले.
अमेरिकेचे इस्रायलला समर्थन
दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी राष्ट्रीय सुरक्षा दलाची बैठक घेतली. यानंतर बायडेन यांनी सैन्याला इराणच्या आक्रमणांपासून इस्रायलचे संरक्षण करण्याचा आदेश दिला आहे. बायडेन म्हणाले की, आम्ही सध्या माहिती गोळा करत आहोत. आतापर्यंत आमच्यापर्यंत आलेल्या माहितीनुसार इराणने इस्रायलवर केलेले आक्रमण पूर्णपणे अयशस्वी आणि कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. हा इस्रायलच्या सैनिकी सामर्थ्याचा, क्षमतेचा आणि अमेरिकी सैन्याच्या शक्तीचा पुरावा आहे.
इराणच्या आक्रमणानंतर कच्चा तेलाच्या किमतीत वाढ
इराणने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाचा परिणाम कच्चा तेलाच्या किमतीवर झाला असून कच्चा तेलाच्या किमतीत जवळपास ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात ‘ग्लोबल बेंचमार्क ब्रेंट क्रूड’ तेलाचे दर २.६ टक्क्यांनी म्हणजेच १.८६ डॉलरने वाढून ७३.५६ डॉलरपर्यंत (६ सहस्र १७९ रुपयांपर्यंत) पोचले आहेत, तर ‘वेस्ट टेक्सॉस इंटरमीडिएट क्रूड’ तेलाचे दर प्रति बॅरल २.४ टक्क्यांनी म्हणजे १.६६ डॉलरने वाढून ६९.८३ डॉलरने पर्यंत वाढले आहेत. या आक्रमणाचा परिणाम जगभरातील अनेक शेअर बाजारात होऊन तेथे घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे.
भारतातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव वाढले, तर त्याचा परिणाम भारतील पेट्रोल-डिझेल यांच्या दरावर होतो. त्यामुळे आताभारतील तेल वितरक आस्थापने पेट्रोल-डिझेल यांचे दर वाढवू शकतात.