Bangladesh On 1971 Atrocities : वर्ष १९७१ विसरलो नसल्‍याने पाकने यासाठी बांगलादेशाची क्षमा मागितल्‍यावर चांगले संबंध स्‍थापन होतील !

बांगलादेशातील अंतरिम सरकारने पाकला सुनावले !

बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारमधील परराष्‍ट्र व्‍यवहार सल्लागार महंमद तौहीद हुसैन (मध्यभागी)

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाला पाकिस्‍तानशी नक्‍कीच चांगले संबंध हवे आहेत; पण १९७१ मध्‍ये जे झाले, ते आम्‍ही विसरलेलो नाही. पाकिस्‍तान सरकारने वर्ष १९७१ मध्‍ये घडलेल्‍या घटनांचा उल्लेख करण्‍याचे धाडस दाखवले आणि त्‍या घटनांबाबत बोलले, तर उभय देशांमधील चांगल्‍या संबंधांचा मार्ग सुकर होईल. विशेषत: पाकिस्‍तानने १९७१ मध्‍ये घडलेल्‍या घटनांसाठी क्षमा मागण्‍याचे धाडस दाखवले, तर हे होईल, अशी स्‍पष्‍ट भूमिका बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारमधील परराष्‍ट्र व्‍यवहार सल्लागार महंमद तौहीद हुसैन यांनी येथे मांडली.

हुसेन म्‍हणाले की, अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी २५ सप्‍टेंबर या दिवशी न्‍यूयॉर्कमध्‍ये संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या महासभेच्‍या वेळी पाकिस्‍तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्‍यासमवेत बैठक घेतली होती. ही एक सौजन्‍यपूर्ण बैठक होती आणि याचा अर्थ असा नाही की, सर्वकाही (म्‍हणजे वर्ष १९७१ ची घटना) आम्‍ही विसरलो आहोत. सौजन्‍य भेटीव्‍यतिरिक्‍त जेव्‍हा आम्‍ही पाकिस्‍तानशी चर्चेसाठी बसू, तेव्‍हा आम्‍ही कठीण सूत्रे उपस्‍थित करू. बांगलादेश वर्ष १९७१ बाजूला ठेवून पाकिस्‍तानशी चांगले संबंध प्रस्‍थापित करण्‍यास इच्‍छुक असल्‍याचे आमच्‍या सरकारने कोणत्‍याही प्रकारे सूचित केले नाही. वर्ष १९७१ मध्‍ये जे घडले ते नेहमीच आमच्‍या हृदयात राहील.

काय घडले होते वर्ष १९७१ मध्‍ये ?

१९७१ मध्ये झालेले अत्‍याचार (संग्रहित छायाचित्र)

बांगलादेशाच्‍या निर्मितीपूर्वी तो संपूर्ण पाकिस्‍तानचा पूर्वेकडील भाग होता. आताच्‍या पाकिस्‍तान्‍यांची भाषा उर्दू, पंजाबी आदी होती, तर पूर्व पाकिस्‍तानातील बंगाली लोकांची बंगाली भाषा होती. या वेळी झालेल्‍या सार्वत्रिक निवडणुकीत पूर्व पाकिस्‍तानातील मुजिबुर रहमान यांच्‍या पक्षाला बहुमत मिळाले होते; मात्र ते बंगाली असल्‍याने पंजाबी मुसलमानांनी त्‍यांना पंतप्रधान करण्‍यास विरोध केला आणि पूर्व पाकिस्‍तानमध्‍ये पाक सैन्‍यांकडून बंगाली मुसलमानांवर, तसेच हिंदूंवर अत्‍याचार केले. यात ३० लाखांहून अधिक लोकांचा मृत्‍यू झाला, तर लक्षावधी महिलांवर बलात्‍कार करण्‍यात आले. यानंतर भारताने यात हस्‍तक्षेप करून पाकिस्‍तानी सैन्‍याला पराभूत करून पूर्व पाकिस्‍तानला पाकिस्‍तानपासून वेगळे करून बांगलादेश म्‍हणून नव्‍या देशाची निर्मिती केली.

संपादकीय भूमिका

बांगलादेशाचे अंतरिम सरकार यावर कायम रहाणार कि भारतद्वेषापोटी पाकशी वर्ष १९७१ विसरून जवळीकता साधणार ?, हे येणारा काळच सांगेल !