श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून ‘गुरूंचे प्रतिरूपही गुरूंसारखे श्रेष्ठ आहे’, याची साधिकेला आलेली प्रचीती !
‘वर्ष २०१० मध्ये मी साधनेला आरंभ केला. वर्ष २०१६ मध्ये मी साधना करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यापासून माझ्या साधनामार्गात अनेक अडचणी आल्या. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला साधनेत मार्गदर्शन आणि साहाय्य केल्यामुळे मी साधनारत आहे. मी अनुभवलेली त्यांची कृपा त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहे.
१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ फुलपाखराच्या माध्यमातून साधना करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत’, असे जाणवणे
जुलै २०१६ मध्ये मी सोलापूर येथे घरी रहात होते. तेव्हा एक पिवळ्या रंगाचे फुलपाखरू माझ्या घरातील तुळशीवर बसलेले मला दिसायचे. ‘त्या फुलपाखराच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मला साधना करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत’, असे मला वाटायचे. त्यामुळेच माझी रामनाथी आश्रमात येण्याची ओढ वाढत गेली.
२. साधिकेसह तिच्या कुटुंबियांचीही साधना होण्यासाठी साहाय्य करणे
वर्ष २०१६ पासून आतापर्यंत, म्हणजे ८ वर्षे मी साधना करत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माझ्या सर्व अडचणी समजून घेतल्या आणि ‘माझ्या कुटुंबियांचीही (मी, माझी बहीण कु. किरण व्हटकर आणि आई कै. (श्रीमती) शशिकला व्हटकर यांचीही) साधना चालू रहावी’, यासाठी सर्वकाही केले.
३. साधनेला नातेवाइकांचा विरोध झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मार्गदर्शन करून मनाची टप्प्याटप्प्याने सिद्धता करून घेणे
मी रामनाथी आश्रमात साधना करू लागल्यापासून माझ्या नातेवाइकांचा साधनेला विरोध होऊ लागला. तेव्हा मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी कठोर साधना करण्यास सांगितले. माझ्या नातेवाइकांना साधनेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्यांनी माझ्या मनाची टप्प्याटप्प्याने सिद्धता करून घेतली. त्यांनी मला ज्या कृती करण्यास सांगितल्या, त्यांचा मला ढालीसारखा आधार वाटायला लागला. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला ‘नातेवाइकांशी तारतम्याने कसे बोलायचे ? नातेवाइकांना न घाबरता भगवंताचा हात धरून निर्णय कसा घ्यायचा ?’, याविषयी अत्यंत कुशलतेने मार्गदर्शन केले.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या संदर्भात विविध अनुभूती येणे आणि त्यांच्याविषयी अतूट श्रद्धा निर्माण होणे
‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला सांगावे आणि मी त्यांचे ऐकावे’, असे होत होते. त्यांचे तंतोतंत आज्ञापालन करण्यासाठी मला कसलीच अडचण आली नाही. ‘त्यांचा प्रसन्न चेहरा दिसणे, ‘त्या गुरुदेवांच्या समवेत मला आशीर्वाद देत आहेत. त्यांनी माझा हात धरला आहे. मी त्यांच्या चरणी बसून नमस्कार करत आहे आणि त्या मला जवळ घेत आहेत’, असे मला सतत जाणवायचे. अशा अनुभूतींमुळे माझे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे नाते आणखी दृढ होत गेले. माझ्या मनात त्यांच्याविषयी अतूट श्रद्धा निर्माण झाली.
५. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या माध्यमातून अनेक नाती अनुभवणे
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सामर्थ्याने माझे मन पुरते भारावून गेले आणि त्यांना माझ्या मनातील सर्वकाही सांगण्याची मला गोडी लागली. त्यांनी माझी सगळ्यांत चांगली मैत्रीण, वेळप्रसंगी गुरु, तर कधी कृपाळू माऊली होऊन माझे परिपालन केले.
६. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना पत्र लिहिल्यावर त्यांनी मार्गदर्शन करणे, त्या वेळी त्यांचा वात्सल्यभाव अनुभवणे आणि त्यांच्या जागी प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे
वर्ष २०१६ पासून ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना पत्र लिहिणे’, हा माझ्या साधनाप्रवासातील एक आनंददायी अनुभव आहे. जेव्हा मी पत्र लिहायला घेते, तेव्हापासूनच ‘पत्रातील विषय श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सूक्ष्मातून पहात आहेत’, असे मला जाणवते. माझे पत्र वाचल्यानंतर त्या मला भ्रमणभाषवरून, प्रत्यक्ष भेटून किंवा साधिकेच्या माध्यमातून ‘मी काय करायला हवे ?’, याविषयी मार्गदर्शन करतात. ‘तू कसलीच काळजी करू नकोस’, हे त्यांचे वाक्य आणि त्या वेळी त्यांच्या चेहर्यावरील वात्सल्यभाव अनुभवून मला त्यांच्या जागी प.पू. गुरुदेवांचेच अस्तित्व प्रकर्षाने जाणवते. ‘पत्रलेखन करता करता मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या प्रेमात कधी पडले ?’, हे मला कळलेच नाही.
अखंड सेवेत असणाऱ्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
गुरुसेवा म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा श्वास आहे. केवळ काही घंटे विश्रांती घेऊन त्या दिवसरात्र गुरुसेवेत मग्न असतात. याविषयी त्या म्हणतात, ‘दिवसरात्र कितीही सेवा केली, तरी ‘आणखी किती करू’, असे होते. ‘विश्रांतीसाठी रात्री डोळे मिटूच नयेत, केवळ सेवारत रहावे’, असे वाटते. ‘अखंड कार्यरत राहून परिपूर्ण सेवा करणे’, यातून त्यांनी कर्मयोग साधला आहे.
७. साधिकेच्या जीवनातील एकमेव श्रद्धास्थान बनलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ !
‘माझ्या जीवनातील एकमेव श्रद्धास्थान, म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ !’, असे माझ्या साधनेचे समीकरणच बनले आहे. ‘त्यांना विचारूनच सर्वकाही करायचे’, असा निश्चय मी प्रतिदिन करत आहे. माझी कसलीही पात्रता नसतांना मला कल्याणकारी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे कृपाशीर्वाद मिळाले. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या माध्यमातून ‘गुरूंचे प्रतिरूपही गुरूंसारखे श्रेष्ठ आहे’, याची प्रचीती मला येत आहे’, याबद्दल मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. गीता व्हटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२४) अखंड सेवारत असणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ