महाराष्ट्रात साधूसंतांच्या केसालाही धक्का लावण्याचे धारिष्ट्य कुणी करणार नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – महाविकास आघाडीच्या काळात पालघर येथे २ साधूंची निर्घृण हत्या करण्यात आली. आमच्या राज्यात मात्र साधूसंतांच्या केसालाही धक्का लावण्याचे धारिष्ट्य कुणी करणार नाही, असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ३० सप्टेंबर या दिवशी मीरा-भाईंदर येथे भागवत सत्संग – सनातन राष्ट्रसंमेलनामध्ये भाषण करतांना एकनाथ शिंदे यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘आम्ही धर्म आणि अध्यात्म मानतो. धर्माचे अधिष्ठान हे सत्तेच्या अधिष्ठानापेक्षा कायमच मोठे आहे. मी मरेपर्यंत हिंदुत्व सोडणार नाही. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेतल्यामुळे आम्ही वेगळे झालो. ‘महाराष्ट्र आणि देश यांना काय देऊ ?’, हा आमचा विचार आहे. सनातन धर्माच्या रक्षणाचे आमचे दायित्व आहे. विकास आणि संस्कृती या दोघांसाठी आम्ही कार्यरत आहोत. राज्यशासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. तिचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे.’’

संतांची वंदनीय उपस्थिती !

या सोहळ्याला जगद्गुरु शंकराचार्य स्वामीजी सदानंद सरस्वतीजी महाराज, जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज, जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामीश्री वासुदेवाचार्य विद्यासागरजी महाराज, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, श्रीकृष्ण कथा प्रवचनकार श्री अनिरुद्धाचार्य महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली.