धर्माच्या लढाईत सत्याच्या विजयासाठी संतांनी जनजागृती करावी ! – फडणवीस
श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठात ‘संत समावेश’ सोहळा !
कोल्हापूर – सांस्कृतिक पुनरुत्थानाचे कार्य चालू आहे. आम्ही हिंदुत्वाचे, सनातन धर्माचे, गोमातेचे रक्षण करणारे आहोत. ज्या वेळी राजसत्तेला मार्गदर्शनाची आवश्यकता असते, त्या वेळी धर्मसत्तेने दिशा दाखवण्याचे काम केले आहे. आताही संत आणि महंत यांनी त्यांचे विश्वरूप दाखवले पाहिजे. या धर्माच्या लढाईत सत्याच्या विजयासाठी संतांनी जनजागृती करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० सप्टेंबर या दिवशी केले. श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ, कोल्हापूर येथे धर्मचिंतनाकरिता चालू असणार्या ‘संत समावेश’ सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पुंगनूर जातीची गाय भेट देण्यात आली.
राज्यात १ लाखांहून अधिक लव्ह जिहादची प्रकरणे आहेत. हे प्रेम नव्हे, तर हिंदु मुलींना फूस लावून केलेले षड्यंत्र आहे ! – देवेंद्र फडणवीस |
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,
१. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर हिंदु समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आणि संत एकत्रित होण्यास आरंभ झाला. पंतप्रधान उघडपणे देवळांमध्ये जातात. पूजाअर्चा करतात. ‘मंदिरात जाणार नाही’, असे म्हणणारेही आता मंदिरात जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना वारीत चार पावले का असेना चालावे लागत आहे. सर्व संत एकत्र येत आहेत, हे पाहून ५० वर्षांच्या राजकारणानंतर शरद पवारांना आध्यात्मिक आघाडी चालू करावी लागली, ही सांस्कृतिक पुनरुत्थानाची शक्ती आहे.
२. देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान चालू आहे. अयोध्येत श्रीराममंदिर उभारले. काशी कॉरिडोर (सुसज्ज मार्ग) निर्माण केला, ज्ञानव्यापी मंदिरातही पूजाअर्चा चालू झाली. देश सर्व आघाड्यांवर प्रगती करत आहे; मात्र याची भीती जगातील काही देशांना वाटू लागली. त्यामुळे या शक्ती देशामध्ये सक्रीय झाल्या आहेत. नास्तिकतेचा विचार मांडणार्या संघटनांना परदेशी निधी मिळू लागला आहे.
लोकसभा निवडणुकीत १४ मतदारसंघांत व्होट जिहाद !जे हिंदुत्व प्रखरतेने मांडतात, अशा लोकांच्या पाठीशी समाज उभा राहतो; म्हणून या समाजात भेदाभेद निर्माण करण्याचे षड्यंत्र सध्या पहायला मिळत आहे. लव्ह जिहाद, धर्म परिवर्तनासोबत निवडणुकीमध्ये ‘व्होट जिहाद’चा प्रकार पहायला मिळाला. १ लाख ९० सहस्र मतांनी पुढे असलेला उमेदवार ४ सहस्र मतांनी हरतो. म्हातारी मेल्याचे दुःख नाही; पण काळ सोकावतो ! ४८ पैकी १४ मतदारसंघांत जिहादी पद्धतीने मतदान झाले. आम्ही सहिष्णु आहोत, कुठल्याही धर्मावर अन्याय करत नाही; मात्र आता हिंदुत्व जागृत करण्याची वेळ आली आहे. आपली संस्कृती टिकवण्याचे दायित्व आपल्या सर्वांचे आहे, असे फडणवीस म्हणाले. |
संपादकीय भूमिका :शासनकर्त्यांनी धरलेली धर्माची आणि हिंदुत्वाची कास निवडणुकीपुरती मर्यादित न रहाता त्यांच्याकडून हिंदुहिताची कार्ये व्हावीत, ही अपेक्षा ! |